महाबळेश्वर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
महाबळेश्वर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
महाबळेश्वर प्रतिनिधी:
श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे यंदाचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला. परंपरेप्रमाणे ग्रामदैवताच्या सवाद्य मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात निघालेली ही मिरवणूक गावभर आकर्षणाचे केंद्र ठरली.
सकाळी सर्वप्रथम देवीला उठवून ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर महाबळेश्वर मंदिरातून मिरवणूक कमल जमाता मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावेळी गावातील तरुण, महिला, जेष्ठ नागरिक तसेच लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. या ठिकाणी पारंपरिक सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला, ज्यात ग्रामस्थ आणि भाविक उत्साहाने सहभागी झाले.
यानंतर मिरवणुकीने गावातील विविध मंदिरांना भेट दिली. मंदिरोभेटीनंतर शेवटी महाबळेश्वर मंदिरात मिरवणुकीचा समारोप झाला. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दरेगावातील ग्रामस्थ देखील या पारंपरिक सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले.
नवरात्र काळामध्ये रोज विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, पूजा-अर्चा तसेच सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण मंगलमय झाले होते. गावातील तरुणाई, महिला आणि जेष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन देवीसेवा करण्याची अखंड परंपरा यंदाही जोपासली.
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक सोहळ्यांची श्रीमंती यामुळे महाबळेश्वरातील हा नवरात्र उत्सव भक्तिमय जल्लोषात पार पडला.
Comments
Post a Comment