शासन आणि जनता यांच्यातील पूल बना — पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा नव्या शासकीय कर्मचाऱ्यांना सल्ला
शासन आणि जनता यांच्यातील पूल बना — पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा नव्या शासकीय कर्मचाऱ्यांना सल्ला
सातारा प्रतिनिधी :
“शासनाच्या धोरणांमुळे तुम्हाला सुलभतेने शासकीय सेवा मिळाली आहे. आता या सेवेत प्रवेश केल्यानंतर शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून काम करा. समाजातील सर्व घटकांसाठी तत्परतेने सेवा देऊन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवा,” असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नव्याने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आयोजित अनुकंपा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण सोहळा स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री देसाई होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने अनुकंपा भरतीची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यात १७२ अनुकंपा उमेदवार आणि २४८ एमपीएससी उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “तुमची नोकरी ही फक्त सुरक्षितता नाही, तर जबाबदारीही आहे. जनतेची सेवा करताना पारदर्शकता आणि तत्परता हेच तुमचे ब्रीद असावे. जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यासाठी तुमची उर्जा सकारात्मकतेने वापरा. तुमच्या अडचणींमध्ये मी सदैव पाठीशी राहीन.”
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, “अनुकंपा नियुक्ती ही शासनाच्या मानवी चेहऱ्याचे प्रतीक आहे. या धोरणाने अनेक कुटुंबांना आधार मिळतो. नोकरी म्हणजे स्थैर्य नाही, तर जबाबदारीची नवी सुरुवात आहे. सेवक म्हणून जनतेप्रती उत्तरदायी राहा,” असा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, नियुक्त उमेदवार आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment