आदिवासी बांधवांसोबत दिवाळी उत्साहात साजरी
आदिवासी बांधवांसोबत दिवाळी उत्साहात साजरी
विजय जाधव,
सातारा प्रतिनिधी –
गोडोली तळ्याच्या परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्य करणारे बिरसा मुंडा आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मात्र या समाजाच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या आनंदाची ज्योत प्रज्वलित करण्याचे कार्य गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सुरज देवडे मित्र समूह तर्फे सातत्याने केले जात आहे.
यावर्षीही गुरुवार दि. २३ ऑक्टोबर रोजी या मित्र समूहाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यात आली. कार्यक्रमात फराळ वाटप, फटाके वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, आदिवासी महिलांनी सर्व कार्यकर्त्यांना ओवाळणी करून भाऊबीज साजरी केली. या भावनिक क्षणामुळे कार्यकर्त्यांसह उपस्थित सर्वांचे मन भरून आले.
मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेने आणि सामाजिक कार्यकर्ते संग्राम बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज देवडे मित्र समूहाने गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांना गती दिली आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि गरजू कुटुंबांना मदतीचे हात देत समाजभान जपणाऱ्या या समूहाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
या उपक्रमात मित्र समूहाचे कार्यकर्ते अजय पार्टे, विक्रम पवार, सचिन वायदंडे, विनोद डावरे, प्रणव मोरे, मनू शेख, पंकज निकम, ऋषिकेश भोसले, राजेश भूसनाळे, अरमान शेख, अतुल कांबळे, रोहन पवार, प्रणित चांगण आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.
आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी आणणारा हा उपक्रम सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण ठरत असून भविष्यात अशा सकारात्मक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment