महाबळेश्वरमध्ये मतदार याद्यांवरुन गोंधळ – आक्षेप नोंदविण्याची अल्प मुदत; नागरिकांचा संताप, मुख्याधिकारींकडे निवेदन

महाबळेश्वरमध्ये मतदार याद्यांवरुन गोंधळ – आक्षेप नोंदविण्याची अल्प मुदत; नागरिकांचा संताप, मुख्याधिकारींकडे निवेदन

विलास काळे 

महाबळेश्वर प्रतिनिधी – 

आगामी महाबळेश्वर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून याविरोधात शहरातून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आक्षेप नोंदविण्याची कालमर्यादा अत्यंत अल्प ठेवण्यात आल्याने नागरिक आणि इच्छुक उमेदवार यांच्यात संतापाची लाट उसळली असून मतदार याद्या तातडीने पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी शहरातील नागरिक आणि इच्छुक उमेदवारांच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यभरात नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेतही प्रशासकीय तयारी युद्धपातळीवर सुरू असून वॉर्ड आरक्षण आणि पुनर्रचित प्रभाग संरचनेची प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून १३ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. परंतु ही मुदत अत्यंत अपुरी असून याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याने शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

मतदार प्रभागच बदलले – नागरिक हैराण

जाहीर करण्यात आलेल्या याद्यांतील विसंगती चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एका प्रभागातील मतदारांची संख्या 150 ते 200 ने कमी-जास्त असल्याचे आढळून आले असून मोठ्या प्रमाणात मतदारांचे नावे चुकीच्या प्रभागांत टाकण्यात आली आहेत. अनेक मतदार आपला प्रभाग ओळखू शकत नाहीत, तर इच्छुक उमेदवारांची दमछाक होत आहे. फॉर्म नमुना ‘ब’ प्रमाणे आक्षेप नोंदविण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून प्रत्येक मतदाराकडून सही घेऊन दुरुस्ती करण्याची जबाबदारी उमेदवारांवर आल्याने प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.

बूथ लेवल अधिकाऱ्यांकडून फेरतपासणीची मागणी

मतदार याद्यांतील त्रुटी दूर करून त्या तातडीने पूर्ववत कराव्यात, प्रत्येक वॉर्डातील मतदारांची नावे योग्य प्रभागात दुरुस्त केली जावीत आणि संपूर्ण यादी बूथ लेवल अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

मुख्याधिकारींचे आश्वासन

निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासन वचनबद्ध असल्याचे सांगत त्यांनी मतदार याद्यांतील त्रुटींची तातडीने पडताळणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

शिष्टमंडळात मान्यवरांची उपस्थिती

शिष्टमंडळात माजी नगरसेवक सुनील शिंदे, रविंद्र कुंभारदरे, संतोष शिंदे, अॅड. संजय जंगम, अतूल सलागरे, विशाल तोष्णिवाल, शरद बावळेकर, रोहित ढेबे, प्रवीन शिंदे, दिनेश बिरामणे, अनिकेत रिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून मतदार याद्यांवरील गोंधळ हा आगामी निवडणूक प्रक्रियेला मोठे वळण देणारा ठरू शकतो, अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl