दिवाळी पाडव्यानिमित्त महाबळेश्वरात भव्य सांज शोभायात्राहरिनामाचा गजर, पारंपरिक वेशभूषेत नागरिक व पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग



दिवाळी पाडव्यानिमित्त महाबळेश्वरात भव्य सांज शोभायात्रा

हरिनामाचा गजर, पारंपरिक वेशभूषेत नागरिक व पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रेषित गांधी,

महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहरात दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत पारंपरिक व भक्तिरसात न्हाऊन निघालेली भव्य सांज शोभायात्रा अत्यंत उत्साहात पार पडली. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” या जयघोषांनी संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते.

शोभायात्रेचे आयोजन माऊली भजनी मंडळ, श्री राम-विठ्ठल मंदिर काकड आरती भक्तगण, नाट्य शिव प्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, महाबळेश्वर शाखा यांच्या वतीने करण्यात आले होते.


पर्यटकांचाही उत्स्फूर्त सहभाग

दिवाळी हंगामामुळे महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती. अनेक पर्यटकांनीही हरिनामाच्या गजरात सहभागी होत हा उत्सव अनुभवला. भगवे झेंडे, टाळ-मृदुंगाचा निनाद, महिलांच्या पारंपरिक फुगड्या, आणि रंगीबेरंगी दीपोत्सवामुळे संपूर्ण शहरात धार्मिक जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.


श्रीराम मंदिरापासून बाजारपेठेपर्यंत भक्तीमय मार्गक्रमण

शोभायात्रेला श्रीराम मंदिरातून दुपारी प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात पोहोचली. येथे पारंपरिक रिंगण सोहळा मोठ्या श्रद्धाभावाने पार पडला.

अभिषेक, भजन व आरती यांसह श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या काकड आरतीचा कार्यक्रम विगत अनेक वर्षांपासून नियमितपणे सुरू असून, दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने या भक्तिमय परंपरेत अधिकच बहर आला.

शोभायात्रेची सांगता पेटिट ग्रंथालयाच्या पटांगणात महाप्रसाद वाटपाने करण्यात आली.


मान्यवरांची उपस्थिती

या शोभायात्रेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य राजेश कुंभारदरे, शाखाध्यक्ष डी. एम. बावळेकर, नाट्य शिव प्रतिष्ठानचे किसन खामकर, माऊली भजनी मंडळाचे प्रभाकर देवकर, श्री राम-विठ्ठल मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी दिलीप शिपटे, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे, विमलताई पार्टे, संतोष आबा शिंदे यांच्यासह स्थानिक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाबळेश्वरातील दिवाळी पाडवा या शोभायात्रेमुळे केवळ पारंपरिक भक्तीभाव अधोरेखित होत नाही, तर स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही हा सोहळा अविस्मरणीय ठरतो — असा सूर आयोजक व नागरिकांनी व्यक्त केला.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl