महाबळेश्वर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्याचा निर्धार – बैठकीत एकमुखाने ठराव
महाबळेश्वर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्याचा निर्धार – बैठकीत एकमुखाने ठराव
जितेंद्र कारंडे – प्रतापगड प्रतिनिधी
महाबळेश्वर । आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवण्यात येणार असल्याचा ठाम निर्धार महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी व्यक्त केला. महाबळेश्वर येथील पुनम हॉटेलमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत मान्यवरांची उपस्थिती
बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष यशवंत घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश कुंभारधरे, काँग्रेस पक्षाचे विश्वनाथ सपकाळ, डॉक्टर नितीन सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, तालुका व शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीचा विजय निश्चित – वक्त्यांचा विश्वास
बैठकीत आगामी निवडणुका एकजुटीने आणि समन्वयातून लढवण्याचा निर्धार व्यक्त करताना वक्त्यांनी भाजप-शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
डॉ. नितीन सावंत म्हणाले:
"आपल्याकडे जनशक्ती आहे; सत्ताधाऱ्यांकडे केवळ धनशक्ती. महाबळेश्वरचा नगराध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होणार यात शंका नाही. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नाक असून पर्यटन शहराचा विकास कोलमडला आहे. आज वेण्णालेक परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची साक्ष आहे."
कार्यकर्त्यांचा सन्मान आणि समन्वय महत्त्वाचा – सूचनांचा वर्षाव
बैठकीत विलास दुधाने, अमित जाधव, आशिष चोरगे, कुंभारधरे, घाडगे, किसनशेठ भिलारे, ऋषी वायदंडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सुचवले की:
- समन्वयाचा अभाव दूर करण्यात यावा
- निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा
- स्थानिक समस्या प्राधान्याने हाताळाव्यात
या सूचना पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या.
“महाबळेश्वर बकाल करणाऱ्यांची पोलखोल करू” – यशवंत घाडगे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष यशवंत घाडगे म्हणाले:
"महाबळेश्वरची दुर्वस्था आज सर्वांसमोर आहे. विकास थांबवून भ्रष्टाचार करणाऱ्यांची पोलखोल प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली जाईल. ज्यांना पक्षाने पद दिले आहे त्यांनी त्याचा मान राखत काम करून पक्ष बळकट करावा."
“ईव्हीएम आणि मतदार याद्यांमध्ये सत्ताधाऱ्यांचा डाव” – शशिकांत शिंदे
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी निवडणुकीतील डावपेचांवर भाष्य करताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले:
"सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएम आणि मतदार याद्यांचा खेळ सुरू केला आहे. तब्बल 75 लाख मतदार नवीन याद्यांमध्ये कसे काय आले? यावर हरकती घेऊन कायदेशीर मार्गाने लढा देणे अत्यावश्यक आहे."
ते पुढे म्हणाले:
"शेतकरी महागाई, अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे होरपळत आहे. परंतु सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणंघेणं नाही. महाविकास आघाडी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल. महाबळेश्वर तालुका शंभर टक्के जिंकणार हे निश्चित."
आयोजन आणि आभार
बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. नितीन सावंत यांनी केले. शेवटी तालुकाध्यक्ष सुभाष कारंडे यांनी उपस्थितांचे आभार मानून बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाल्याची नोंद केली.
Comments
Post a Comment