महाबळेश्वर तालुक्याच्या विकासात अडथळा आणणाऱ्या ब्लॅकमेल प्रवृत्तीवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चा तीव्र निषेध
महाबळेश्वर तालुक्याच्या विकासात अडथळा आणणाऱ्या ब्लॅकमेल प्रवृत्तीवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चा तीव्र निषेध
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका हा राज्यातील एक संवेदनशील तसेच अग्रगण्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात, ज्यामुळे पर्यटनाशी निगडित अनेक व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण होतात. मात्र, या विकासप्रक्रियेला काही ठिकाणी स्वार्थी आणि ब्लॅकमेल करणाऱ्या प्रवृत्तींकडून अडथळे निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.
महाबळेश्वरमध्ये अनेक तरुण व्यावसायिक आणि उद्योजक नवनवीन व्यवसाय संकल्पना राबवून विकासात हातभार लावत आहेत. पण काही स्वयंघोषित समाजसेवक व प्रसारमाध्यमातील घटक या व्यावसायिकांकडून अनावश्यक त्रास देऊन आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप होत आहेत. “तुझं काम बेकायदेशीर आहे”, “आम्ही कारवाई करू” अशा धमक्या देऊन ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष सुभाष कारंडे यांनी अशा ब्लॅकमेल प्रवृत्तीविरुद्ध तीव्र निषेध नोंदविला आहे.
सुभाष कारंडे म्हणाले,
“महाबळेश्वरचा विकास होणे ही काळाची गरज आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. आपण स्वतः रोजगार निर्माण करू शकत नाही, म्हणून दुसऱ्याचा रोजगार हिसकावण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशी प्रवृत्ती समाज आणि तालुक्याच्या प्रगतीसाठी घातक आहे.”
त्यांनी पुढे इशारा दिला की,
“जर या ब्लॅकमेल प्रवृत्तीवर त्वरित आळा घातला नाही, तर आम्ही कायदेशीर मार्गाने अशा लोकांना उत्तर देऊ. महाबळेश्वरच्या विकासात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्यात येईल.”
महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासन विविध उपक्रम राबवत असताना, काही व्यक्तींच्या स्वार्थी हालचालींमुळे संपूर्ण वातावरण दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिक, नागरिक आणि समाजघटकांनी विकासाच्या दिशेने एकत्र येऊन अशा प्रवृत्तीला विरोध करणे आवश्यक असल्याचे कारंडे यांनी आवाहन केले.
तसेच त्यांनी स्पष्ट केले की,
“महाबळेश्वर तालुका हा केवळ पर्यटन नव्हे तर स्थानिक संस्कृती, परंपरा आणि आर्थिक स्थैर्याचा आधार आहे. त्यामुळे विकासात अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध सामाजिक चळवळ उभी करावी लागेल, तरच या भूमीचा खरा विकास साधता येईल.”
कारंडे यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील व्यावसायिक व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, विकासविरोधी प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी एकजूट निर्माण करण्याची चळवळ आकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment