महाबळेश्वर तालुका – जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले भिलार गटात नव्या नेतृत्वाची चाचपणी – तळदेव गटात महायुतीत आतली धुरळेबाजी; राजेंद्र शेठ राजपुरे यांचीही उमेदवारी चर्चेत



महाबळेश्वर तालुका – जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले

भिलार गटात नव्या नेतृत्वाची चाचपणी – तळदेव गटात महायुतीत आतली धुरळेबाजी; राजेंद्र शेठ राजपुरे यांचीही उमेदवारी चर्चेत

जितेंद्र कारंडे,

प्रतापगड प्रतिनिधी –


महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा राजकीय माहोल तापू लागला आहे. तालुक्यातील दोन्ही गटांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली असून राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाचे वर्चस्व, गटबाजी, महायुतीतील अंतर्गत संघर्ष तसेच महाविकास आघाडीची रणनिती अशी बहुआयामी लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


भिलार गट – एसटी ओपन आरक्षणामुळे नव्या समीकरणांची निर्मिती

भिलार गट हा यंदा अनुसूचित जमाती (एसटी) – सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या गटात पूर्वी नीता संतोष आखाडे यांनी प्रतिनिधित्व केले होते. या गटात काही वर्षांपूर्वीपर्यंत स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांचा प्रभाव प्रबळ होता. त्यांच्या नंतर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी गटात प्रभावी नेतृत्व उभे केले.

आरक्षणाच्या बदलामुळे यंदा राजेंद्र शेठ राजपुरे यांना थेट उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असली, तरी त्यांचा जनाधार आणि संघटनशक्ती लक्षात घेता त्यांच्या गोटातील उमेदवाराला वरचष्मा मिळू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कुंभरोशी युवा कार्यकर्ते सचिन सपकाळ हे त्यांचे विश्वासू म्हणून या गटात आघाडीवर असल्याचे दिसते. तर क्षेत्र महाबळेश्वरचे पंढरीनाथ लांगी, माजी सदस्य सुरेश सपकाळ, माजी सदस्य ज्योती जाधव, दादा धामणसे आणि संजय केळगणे यांचीही नावे दावेदारांच्या यादीत आहेत. त्यामुळे भिलार गटात चार – पाच दावेदारांतून एकत्रित उमेदवार ठरवण्याचे आव्हान राजपुरे समर्थकांसमोर आहे.


तळदेव गट – खुले आरक्षण, महायुतीत ताणतणाव वाढले

तळदेव गट यंदा खुला प्रवर्ग असल्याने येथे मोठी राजकीय चुरस अपेक्षित आहे. पूर्वी या गटातून शिवसेनेच्या प्रणिती जंगम या निवडून आल्या होत्या. मात्र गत पाच वर्षांत मर्यादित जनसंपर्क आणि संघटनशक्तीच्या अभावामुळे शिवसेनेविरुद्ध नाराजी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या गटात शिवसेना (शिंदे गट) प्रभावशाली मानला जात असला तरी स्थानिक स्तरावर राजेंद्र शेठ राजपुरे यांनी मागील दोन वर्षांत विशेष लक्ष केंद्रित करून जनसंपर्क वाढवला आहे. अनेक गावांमध्ये त्यांनी संघटनात्मक बैठकांचे आयोजन केले स्थानिक कार्यकर्ते त्यांना उमेदवारीच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आग्रह करु शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

तळदेव गटातील दावेदारांची संभाव्य यादी अशी –

  • राजेंद्र शेठ राजपुरे – (जिल्हा बँक संचालक, जनाधार विस्तृत)
  • अजित संकपाळ – (शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते)
  • बजरंग संकपाळ – (स्थानिक प्रभावशाली कार्यकर्ते)
  • संजय गायकवाड – ( माजी सभापती)

या गटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महायुतीतील अंतर्गत स्पर्धा. शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी एकत्र राहून निवडणूक लढवायची की स्वबळाचा मार्ग निवडायचा, याचा निर्णय अद्याप स्पष्ट नाही. जर महायुती एकत्र राहिली तर या गटात विरोधी उमेदवार मिळणे कठीण होईल, असे जाणकारांचे मत आहे. मात्र जर महायुतीत मतभेद झाले, तर ही निवडणूक राजेंद्र शेठ राजपुरे विरुद्ध शिवसेना अशी थेट प्रतिष्ठेची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


महाविकास आघाडीची तयारी गुपचूप – पण मजबूत

दुसरीकडे महाविकास आघाडीने दोन्ही गटांसाठी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी स्थानिक पातळीवर गाव चलो अभियान, संपर्क यात्रा अशा कार्यक्रमांद्वारे पायाभरणी सुरू केली आहे. भिलार गटात आदिवासी महादेव कोळी समाजाचे मत निर्णायक ठरणार असून तळदेव गटात गावागावांतील पाणी, रस्ते आणि आरोग्याचे प्रश्न हे मुद्दे केंद्रस्थानी राहतील.


निष्कर्ष – प्रतिष्ठेची निवडणूक, गटबाजीची ताकद की विकासाचा मुद्दा?

महाबळेश्वर तालुक्यातील ही निवडणूक स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

  • भिलार गटात नेतृत्व कोणाचे चालणार?
  • तळदेव गटात महायुती तुटणार की टिकणार?
  • राजेंद्र शेठ राजपुरे भिलार गट सांभाळत तळदेव गटातून मैदानात उतरणार का?
  • शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत उभारली जाणार?

याचा अंतिम निर्णय पुढील काही दिवसांत होणाऱ्या राजकीय घडामोडींवर अवलंबून आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl