गावाच्या समृद्धीसाठी स्वयंस्फूर्तीने देणग्यांचा ओघ; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामविकासाला नवे बळ
गावाच्या समृद्धीसाठी स्वयंस्फूर्तीने देणग्यांचा ओघ; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामविकासाला नवे बळ
विजय जाधव ,
सातारा प्रतिनिधी :
“आपल्या गावाचा सन्मान, आपली जबाबदारी” — या भावनेतून सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये एक सकारात्मक चळवळ उभी राहिली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने ग्रामविकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. विशेष म्हणजे या अभियानात गावकऱ्यांसोबत गावाबाहेर राहणारे नागरिकही स्वयंस्फूर्तीने देणग्या देत आपल्या मातृगावाच्या समृद्धीत हातभार लावत आहेत.
गावाबाहेरील नागरिकांचा उत्साह
मुलभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि सार्वजनिक प्रकल्पांसाठी गावकऱ्यांनी तसेच गावाबाहेरील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर देणग्या देण्यास सुरुवात केली आहे. “आपल्या गावाचा विकास हा आपला अभिमान” या भावनेतून अनेकांनी स्वतःहून आर्थिक मदत जाहीर केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही जणांनी आपल्या सोशल नेटवर्कवर गावासाठी देणगी देण्याचे आवाहनही केले असून, त्यातून प्रेरित होऊन इतर नागरिक देखील सहभागी होत आहेत.
अभियानाचा उद्देश आणि स्वरूप
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेले उपक्रम आहे. या अभियानांतर्गत हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीने किमान दोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून सार्वजनिक सुविधा उभाराव्यात, अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. गावाच्या विकासात स्थानिकांसोबतच बाहेरील गावकऱ्यांचा सहभाग वाढविणे, गावात रोजगार निर्मिती करणे, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत ठोस कामगिरी करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
ग्रामस्थांची एकजूट
अनेक गावांत ग्रामपंचायत, स्थानिक स्वयंसेवक संस्था आणि नागरिक एकत्र येऊन ग्रामविकासाचे आराखडे तयार करत आहेत. शाळांची दुरुस्ती, अंगणवाडी इमारत, पिण्याच्या पाण्याची टाकी, अंतर्गत रस्ते, कचरा व्यवस्थापन, आणि हरित परिसर निर्मिती यांसारख्या प्रकल्पांसाठी निधी संकलन सुरू आहे. “गड्या आपुला गाव नंबरात आला पाहिजे” हा नारा आता गावागावात घुमत आहे.
सोशल मीडियाची मोठी भूमिका
गावाबाहेर नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी गेलेल्या नागरिकांना फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सारख्या माध्यमांतून गावातील घडामोडींची माहिती मिळत आहे. याच माध्यमांतून देणगीची माहिती, गावाची प्रगती आणि स्पर्धेतील स्थान याबाबत अपडेट मिळाल्याने उत्साह अधिक वाढत आहे. काही गावांनी तर स्वतंत्र गट तयार करून “गाव विकास फंड” सुरू केला असून, देणगीदारांची नावे पारदर्शक पद्धतीने प्रसिद्ध केली जात आहेत.
ग्रामविकासाची प्रेरणादायी चळवळ
गावाची जन्मभूमी, बालपणाच्या आठवणी आणि मातीची ओढ — या भावनिक नात्यामुळे नागरिक या उपक्रमात सहभागी होत आहेत. गावात सुरू असलेले हे लोकवर्गणी अभियान फक्त आर्थिक मदत नाही, तर गावाच्या विकासाची सामाजिक बांधिलकी आहे.
या अभियानामुळे गावोगावी नव्या ऊर्जा निर्माण होत असून, गावकऱ्यांचा सहभाग हेच त्याचे यश ठरत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही स्पर्धा ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारी ठरत आहे.
“समृद्ध गाव म्हणजे आपला अभिमान”
या उपक्रमातून एकत्रित प्रयत्न, सामाजिक सहभाग आणि विकासाची नवी दृष्टी निर्माण होत आहे. गावाला मिळणारा पुरस्कार किंवा सन्मान हा केवळ ग्रामपंचायतीचा नसून प्रत्येक गावकऱ्याच्या योगदानाचे प्रतीक ठरणार आहे.
गावोगाव सुरू झालेल्या या देणगी मोहिमेमुळे समृद्धीची वाटचाल आता जनतेच्या हातात आली आहे. अशा प्रकारे गावकऱ्यांनी आणि गावाबाहेरील नागरिकांनी मिळून उभारलेली “स्वयंस्फूर्तीची समृद्धी” ही ग्रामीण विकासासाठी एक आदर्श ठरणार आहे.
Comments
Post a Comment