सुंदरराव मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कृषी विभाग अधिकाऱ्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन— आधुनिक शेतीत तरुण पिढीची सहभागिता आवश्यक : उपकृषी अधिकारी भरत कदम

सुंदरराव मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कृषी विभाग अधिकाऱ्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
— आधुनिक शेतीत तरुण पिढीची सहभागिता आवश्यक : उपकृषी अधिकारी भरत कदम

प्रकाश कदम, 

पोलादपूर प्रतिनिधी :

शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने कृषीविषयक विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलादपूर तालुका कृषी विभागातील अधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, कृषी तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांबाबत सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुनील बलखंडे यांनी सर्व उपस्थित अधिकारी व पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या स्वागतपर भाषणात कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत तरुणांनी या क्षेत्रातील नवसंशोधनांकडे वळण्याचे आवाहन केले.

मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना उपकृषी अधिकारी श्री भरत कदम यांनी “भारत हा देश कृषीप्रधान असून, आजच्या काळात शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास तरुण पिढीसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होऊ शकतात,” असे मत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘महाविस्तार ए.आय.’ या कृषी विभागाने विकसित केलेल्या ॲपबाबत सविस्तर माहिती दिली. हे ॲप शेतकऱ्यांचा “खरा डिजिटल मित्र” ठरू शकते, असे सांगत त्यांनी त्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कदम यांनी सांगितले की, या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या आधार कार्ड व ‘फार्मर आयडी’ लिंक करून शेतीची माती तपासणी, हवामान अंदाज, पिकांवरील रोग निदान व त्यावरील उपाययोजना यासंबंधी रिअल टाईम माहिती मिळवू शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्या शेतकरी पालकांना हे ॲप डाउनलोड करून वापरण्यास मदत करावी, असे त्यांनी विशेष आवाहन केले.

यानंतर उपकृषी अधिकारी श्री रवींद्र गुंड यांनी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज व सबसिडी योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी कृषी आधारित लघुउद्योग, अन्नप्रक्रिया आणि ग्रामीण उद्योजकतेबाबतही मार्गदर्शन केले.

सहाय्यक कृषी अधिकारी श्री अनिल वलेकर यांनी ‘महाविस्तार ए.आय.’ ॲपच्या माध्यमातून फळबाग, सौर कृषी पंप, अन्नप्रक्रिया उद्योग, तसेच विविध कृषी योजनांचा लाभ कसा घ्यावा हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी क्षितिजा पाटील, निवृत्ती बरकडे, अनय मिसाळ, मोनिका मिसाळ, अविनाश खरात यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश जाधव यांनी केले, तर डॉ. सुधाकर जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला प्रा. संजय कसबे, प्रा. स्नेहल कांबळे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयक जिज्ञासा वाढली असून, आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी क्षेत्राशी उद्योगधंद्यांचा मेळ साधण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl