महायुती म्हणूनच लढवण्यात येणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका — पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे मार्गदर्शन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटन बळकटीसाठी विशेष सूचना — जिल्ह्यातील प्रमुख, पदाधिकारी व नेते उपस्थित
महायुती म्हणूनच लढवण्यात येणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका — पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे मार्गदर्शन
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटन बळकटीसाठी विशेष सूचना — जिल्ह्यातील सर्व शहर प्रमुख, पदाधिकारी व नेते उपस्थित
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी, प्रमुख नेते, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि शहर प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक आज उत्साहात पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांनी या बैठकीत उपस्थित राहून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दिशा व मार्गदर्शन केले.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांतील संघटनात्मक उपक्रमांचा आढावा घेतला. यानंतर बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले, “येत्या काळातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या रूपातच लढवल्या जातील. शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीत आपल्या संघटनशक्तीच्या बळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अभिमानास्पद विजय मिळवून द्यावा.”
ते पुढे म्हणाले, “आपल्या पक्षाने केलेली विकासकामे, लोकहितकारी योजना आणि शासनाचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे ही आजची काळाची गरज आहे. याच माध्यमातून आपण लोकांचा विश्वास अधिक दृढ करू शकतो.”
देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील प्रशासनिक कामकाजाचा विशेष उल्लेख करत सांगितले, “सातारा जिल्हा पालकमंत्री कार्यालय हे राज्यातील अव्वल कामगिरी करणारे कार्यालय ठरेल. या कामगिरीचा थेट लाभ जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मिळेल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.”
या बैठकीस जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, फलटण, महाबळेश्वर, वाई, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा आदी शहरांचे प्रमुख उपस्थित होते. सर्व शहर प्रमुखांनी आपल्या विभागातील संघटनात्मक कार्याचा आढावा देत महायुती सरकारच्या योजना, स्थानिक प्रश्नांवरील जनसंवाद, व बूथस्तरीय रचना यासाठी पुढील नियोजन सादर केले.
बैठकीस जिल्हाप्रमुख रणजीत भोसले, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शारदा जाधव, संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, उपजिल्हाप्रमुख विकास अण्णा शिंदे, विधानसभा महिला आघाडी प्रमुख वर्षाताई आरडे, तसेच सर्व उपजिल्हा प्रमुख, विधानसभा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, युवासेना, महिला आघाडी, शेतकरी संघटना आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान संघटनात्मक बळकटीसाठी सविस्तर कार्य आराखडा निश्चित करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात गावपातळीवरील प्रचार मोहीम राबवणे, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि कार्यकर्त्यांमधील संवाद वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला.
शेवटी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने ठरवले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) ही जनतेच्या विश्वासाची पहिली पसंती ठरेल आणि सातारा जिल्हा महायुतीच्या विजयाचा बालेकिल्ला बनेल.
Comments
Post a Comment