“विवाह नोंदणीसह वृक्षारोपण” — बावधन ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक संकल्पमाझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत अनोखा उपक्रम : ‘एक विवाह, एक झाड’
“विवाह नोंदणीसह वृक्षारोपण” — बावधन ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक संकल्प
माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत अनोखा उपक्रम : ‘एक विवाह, एक झाड’
वाई प्रतिनिधी :
ग्रामपंचायत बावधन (LGD Code 190372), ता. वाई, जि. सातारा यांनी माझी वसुंधरा ६.० अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाला नवा आयाम देणारा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीने ठरविले आहे की, आता गावातील प्रत्येक विवाह नोंदणीसोबत वधू-वरांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारणे अनिवार्य असेल.
ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत सदस्य श्री. संदीप पिसाळ यांनी हा अभिनव ठराव मांडला, आणि सर्व सदस्यांनी तो एकमताने मंजूर केला. या निर्णयामुळे विवाह सोहळ्यासारख्या आनंददायी प्रसंगातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार असून गाव हरित बनविण्याकडे मोठे पाऊल पडले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ आज श्री. योगेश वेदपाठक व सौ. धनश्री वेदपाठक या दांपत्याच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी पाची देऊळ डोंगर परिसरात वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री. संदीप पिसाळ, कॉम्प्युटर ऑपरेटर श्री. श्रीराम पोतदार, श्री. शशिकांत चव्हाण, श्री. रोहित सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षारोपणानंतर सरपंच सौ. वंदना कांबळे व ग्रामपंचायत अधिकारी श्री. आर. व्ही. चव्हाण यांच्या हस्ते वधू-वरांना डिजिटल बारकोड असलेले विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या निर्णयाबाबत बोलताना सरपंच सौ. वंदना कांबळे यांनी सांगितले की,
“बावधन ग्रामपंचायत ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत शाश्वत विकास, स्वच्छता, हरित गाव आणि जलसंवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. विवाह नोंदणीसोबत वृक्षारोपणाचा उपक्रम म्हणजे नव्या जीवनाची सुरुवात निसर्गाशी नाते जोडत करण्याचा सुंदर उपक्रम आहे.”
ग्रामपंचायत तर्फे सर्व नवविवाहित जोडप्यांना आवाहन करण्यात आले आहे की, विवाह नोंदणी करताना झाड लावून त्याचा जिओ-टॅग फोटो ग्रामपंचायतीत सादर करावा, जेणेकरून “एक विवाह, एक झाड” हा संकल्प प्रत्यक्षात साकार होईल आणि गाव हरित, समृद्ध व पर्यावरणपूरक बनेल.
Comments
Post a Comment