सासपडेतील अल्पवयीन शालेय मुलीच्या खुनातील आरोपी २४ तासांत अटकेत – स्थानिक गुन्हे शाखा सातारा व बोरगाव पोलिसांची संयुक्त कारवाई
सासपडेतील अल्पवयीन शालेय मुलीच्या खुनातील आरोपी २४ तासांत अटकेत – स्थानिक गुन्हे शाखा सातारा व बोरगाव पोलिसांची संयुक्त कारवाई
सातारा, प्रतिनिधी –
दि. ११ ऑक्टोबर २०२५ :
सातारा तालुक्यातील सासपडे गावात अल्पवयीन शालेय मुलीचा तिच्याच राहत्या घरात निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपीला अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्याचे यश स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि बोरगाव पोलिस स्टेशन यांना मिळाले आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
घटना दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.३० ते पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. पीडित अल्पवयीन शालेय मुलगी घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून तिच्या डोक्यात प्राणघातक वार करून निर्घृण खून केला. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर १६३/२०२५ भारतीय न्यायसंहिता कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तातडीने तपासाचे आदेश दिले.
CCTV नसल्याने आव्हान — पोलिसांनी उभा केला तपासाचा धागा
सासपडे गावातील घटना रहदारीच्या भागात असली तरी परिसरात कोणत्याही प्रकारचे CCTV कॅमेरे उपलब्ध नसल्याने तपासात मोठे आव्हान होते. तरीही पोलिसांनी हार न मानता गोपनीय बातमीदारांचा जाळे तयार केले, गावातील संशयित आणि नातेवाईकांची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती येत नसतानाही तपास पथकाने सर्च मोहीम सुरू ठेवली.
गुप्त माहितीवरून आरोपी जेरबंद
११ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी सासपडे ते नागठाणे रस्त्यावरील खिंडीत असलेल्या एका टेकडीवर थांबल्याचे समजले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलीस ठाण्याचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पो.ह.वा. अमोल माने, अमित कर्णा, जयवंत खाडे, शिवाजी भिसे, पो.कॉ. स्वप्निल दोड, रविराज व इतर कर्मचारी सहभागी होते.
पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास बोरगाव पोलिस ठाण्यात सुरू आहे.
पोलिसांची तत्परता — गुन्हे उकलण्यात यश
कोणताही ठोस पुरावा किंवा तांत्रिक माहिती नसतानाही अवघ्या २४ तासांत हा गंभीर आणि संवेदनशील गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या या जलद कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment