श्री. सुभाष जोतीराम ढाणे सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात भावनिक वातावरण; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अश्रू अनावर
श्री. सुभाष जोतीराम ढाणे सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात भावनिक वातावरण; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अश्रू अनावर
प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी –
कांगोरीगड माध्यमिक विद्यालय, मोरसडे येथे गेली ३३ वर्षे अध्यापनाची अखंड सेवा बजावणारे आदरणीय शिक्षक श्री. सुभाष जोतीराम ढाणे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात भावनांचा महापूर ओसंडून वाहिला. आपल्या प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षकांना अश्रू अनावर झाले. विद्यालयाच्या परिसरात झालेला हा सोहळा शिक्षक-विद्यार्थी नात्याच्या दृढतेचा आणि आदराचा प्रतीक ठरला.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ विद्यालयात अखंड निष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांविषयी अपार प्रेमाने कार्य करणारे ढाणे सर केवळ शिक्षक नव्हते, तर एक मार्गदर्शक, स्नेही व प्रेरणास्थान होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित केला. त्यामुळे सरांची सेवापूर्ती ही केवळ एक प्रशासकीय घटना नसून, भावनिक क्षण ठरला.
समारंभाच्या प्रारंभी ढाणे सरांचा भव्य सत्कार मिरवणुकीतून करण्यात आला. विद्यालयापासून ते स्थानिक मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांनी व माजी विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. अनेकांनी या प्रसंगी सरांच्या कार्याची आठवण करत डोळ्यांत पाणी आणले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री. वाय. सी. जाधव साहेब यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध “छावा” चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. लक्ष्मण (दादा) उतेकर, श्री. प्रकाश ढाणे, माजी असिस्टंट गव्हर्नर रोटरी पुणे ३१ – श्री. सूर्यकांत महाडिक, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बापू बांदल, कार्यवाह श्री. दत्तात्रय उतेकर, तसेच संस्थेचे विश्वस्त डॉ. सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय पोलादपूर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि दोन्ही शाखांतील सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वक्त्यांनी आपल्या भाषणातून ढाणे सरांच्या कार्याचा गौरव करत, “त्यांच्या कार्याची खरी पोचपावती म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आलेले भावनाश्रू आहेत; तोच त्यांचा सर्वात मोठा सत्कार आहे,” अशा भावना व्यक्त केल्या. सहकारी शिक्षकांनी सांगितले की, “ढाणे सर नेहमीच सहकाऱ्यांसोबत मित्रासारखे वागले, विद्यार्थ्यांशी पित्यासारखे प्रेम केले, आणि विद्यालयाच्या प्रगतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले.”
कार्यक्रमाच्या शेवटी ढाणे सरांनी आपल्या सेवाजिवनाचा आढावा घेत भावनिक शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “शिक्षक म्हणून माझ्या आयुष्यात विद्यार्थ्यांचा आदर आणि प्रेम हेच माझे खरे संपत्ती आहे.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित सभागृहात पुन्हा एकदा भावनांचा महापूर ओसंडला.
अशा प्रकारे, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय, मोरसडे येथे पार पडलेला हा सेवापूर्ती गौरव समारंभ शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील बंध अधिक दृढ करणारा ठरला. श्री. सुभाष जोतीराम ढाणे यांच्या कार्याची शाश्वत आठवण सर्वांच्या मनात कायम राहील.
---
Comments
Post a Comment