कुंभरोशी – पार रस्त्याची दुरावस्था; प्रवासी नागरिक आणि भाविक त्रस्त, प्रशासनाविरोधात संतापाची लाट

कुंभरोशी – पार रस्त्याची दुरावस्था; प्रवासी नागरिक आणि भाविक त्रस्त, प्रशासनाविरोधात संतापाची लाट


✍️जितेंद्र कारंडे,

 प्रतापगड प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुक्यातील महत्त्वाचा आणि धार्मिक दृष्टीने अतिशय संवेदनशील समजला जाणारा कुंभरोशी ते पार हा मुख्य मार्ग सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेला आहे. या मार्गावरून श्रीराम वरदायिनी मातेच्या मंदिराकडे दररोज असंख्य भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक प्रवास करत असतात. मात्र, रस्त्याच्या अत्यंत दुरावस्थेमुळे या सर्वांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या रस्त्यावर खोल खड्डे, उखडलेला डांबर, पावसाच्या पाण्याने भरलेली खचलेली ठिकाणे आणि अपघाताला आमंत्रण देणाऱ्या वळणांमुळे वाहनचालक आणि दुचाकीस्वार दोघांनाही दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विशेषत: वृद्ध, महिला व शालेय विद्यार्थी यांना प्रवास करताना अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष
स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) लेखी तक्रारी करून या रस्त्याच्या डांबरीकरणाची आणि तातडीने दुरुस्तीची मागणी केली. मात्र, आजवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. काही ठिकाणी फक्त खडी टाकून “काम सुरू आहे” असा दिखावा करण्यात आल्याची नाराजी नागरिकांमध्ये दिसून येते.

अनेक गावांतील नागरिकांचा दैनंदिन प्रवास प्रभावित
या रस्त्याने पार, बिरमणी, घोगलवाडी, बिरवाडी, शिरवली, हातलोट, कासरूड, दुधगाव, झांजवड, चतुर्बेट, घोणसपूर इत्यादी अनेक  गावांतील नागरिक दररोज महाबळेश्वरकडे आणि परत गावाकडे प्रवास करतात. या सर्वांचे सध्या रस्त्याच्या दुर्दशेमुळे अतोनात हाल होत आहेत. अनेक वाहनांचे नुकसानही होत असून, वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणे कठीण ठरत आहे.

भाविक आणि पर्यटकांमध्ये नाराजी
श्रीराम वरदायिनी मातेच्या दर्शनासाठी दररोज येणारे भाविक या मार्गाच्या वाईट स्थितीबद्दल तक्रार नोंदवतात. पर्यटनाच्या हंगामात या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते, त्यामुळे स्थानिक पर्यटनाच्या प्रतिमेलाही तडा जात आहे.

“दखल घेणार का सार्वजनिक बांधकाम विभाग?”
गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. “प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकात निधी मंजूर होतो, पण प्रत्यक्ष काम होत नाही. आम्ही आता शासनाच्या ठोस भूमिकेची वाट पाहत आहोत,” असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतांनी लवकरात लवकर रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करण्याची मागणी केली असून, “प्रवासी आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय तातडीने हाताळला नाही, तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल” असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl