वलवन येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन; शिंदी विभागाला आरोग्य सेवेचा मोठा आधार
वलवन येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन; शिंदी विभागाला आरोग्य सेवेचा मोठा आधार
तपोळा प्रतिनिधी:
ग्रामीण आरोग्य सेवेच्या उभारणीत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या वलवन आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन रविवारी वलवन येथे उत्साहात संपन्न झाले. शिंदी विभागातील वलवन, शिंदी, चकदेव, आरव, मोरणी यांसह परिसरातील हजारो नागरिकांसाठी हे उपकेंद्र आरोग्यदायी भविष्याचा मजबूत पाया ठरणार आहे.
या उपकेंद्राची मंजुरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली आहे. शिंदी गावचे सुपुत्र भूषण मोरे आणि नितीन मोरे यांच्या अथक प्रयत्नांना नवरुण मित्र मंडळ, मौजे शिंदी-मुंबई यांचा भक्कम पाठिंबा लाभला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा आरोग्य सुविधा प्रकल्प साकार होत असल्याचे यावेळी बोलताना मान्यवरांनी नमूद केले.
भूमिपूजन सोहळा चकदेव गावचे सुपुत्र लक्ष्मण गणपत जंगम यांच्या हस्ते मंत्रोच्चारांच्या गजरात संपन्न झाला. या वेळी महाबळेश्वर तालुका शिवसेना प्रमुख गणेश उतेकर यांच्यासह राजकीय, सामाजिक व ग्रामविकास क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदी गावातील ज्येष्ठ नेते सुरेश लाडकोजीराव मोरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. वलवन ग्रामस्थांचे प्रतिनिधित्व करत सिताराम जाधव यांनी उपकेंद्रासाठी जमिनीची उपलब्धता करून दिल्याबद्दल स्थानिकांचे आभार मानले.
तसेच परिसरातील लोकप्रतिनिधींमध्ये आरवचे सरपंच सुनील शेलार, तपोळा ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद धनावडे, वेळापूर सरपंच श्रीराम सकपाळ, अहिर सरपंच बबन सकपाळ यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी सामाजिक पुढाकारासाठी ओळखले जाणारे विठ्ठल जाधव, अनंत मोरे, शंकर जंगम, अशोक शिंदे, विकास मोरे, योगेश मोरे, सौरभ मोरे, संदेश जंगम आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच परिसरातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये अजित मोरे, रणधीर मोरे, संजय मोरे, संतोष जंगम, कृष्णा जाधव, भीमाजी जाधव, रामचंद्र जंगम, राजेंद्र ढेबे, भगवान माने आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमाबद्दल बोलताना वक्त्यांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उभारण्याची गरज अधोरेखित केली. उपकेंद्र सुरू झाल्यानंतर गर्भवती महिलांची तपासणी, लसीकरण मोहीम, बालकांच्या आरोग्य सेवा, सामान्य उपचार व आपत्कालीन प्राथमिक उपचार यासाठी आता तालुक्याच्या ठिकाणी धाव घेण्याची गरज उरणार नाही, असे गणेश उतेकर यांनी सांगितले. ग्रामीण जनतेने या निर्णयाचे स्वागत करत मोरे परिवार व नवरुण मित्र मंडळ यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.
शेवटी आयोजकांच्या वतीने परिसरातील ग्रामस्थ, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली. या भूमिपूजनामुळे शिंदी विभागातील विकासाचा वेग वाढणार असून आरोग्य सेवेत क्रांती घडवणारा हा प्रकल्प ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment