वेंगळे, वरचीवाडी व सोनाट शाळांतील विद्यार्थ्यांना “सेवेचे ठायी तत्पर” संस्थेकडून सॅंडल वाटप– तरुणांच्या सेवाभावी उपक्रमातून शिक्षणाला बळ
वेंगळे, वरचीवाडी व सोनाट शाळांतील विद्यार्थ्यांना “सेवेचे ठायी तत्पर” संस्थेकडून सॅंडल वाटप
– तरुणांच्या सेवाभावी उपक्रमातून शिक्षणाला बळ
संजय संकपाळ
तापोळा प्रतिनिधी :
शिक्षणातून सामाजिक विकास साधण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या “सेवेचे ठायी तत्पर” या तरुणांच्या संस्थेकडून येरणे केंद्रातील वेंगळे, वेंगळे वरचीवाडी आणि सोनाट शाळांमधील विद्यार्थ्यांना सॅंडलचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे, तसेच शिक्षणातील अडचणी शोधून त्यावर उपाय करणे हा संस्थेचा मुख्य हेतू असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत एकूण २२ विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे सॅंडल भेट देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आणि त्यांच्या पावलांनाही आत्मविश्वासाची चाल मिळाली.
या छोटेखानी पण हृदयस्पर्शी कार्यक्रमाला सेवेचे ठायी तत्पर संस्थेचे सौरभ सकपाळ, सागर सुरेश सकपाळ, अनिकेत मोहन सकपाळ, अंकित आणि शैलेश हे उपस्थित होते. विशेष म्हणजे सागर सुरेश सकपाळ आणि अनिकेत मोहन सकपाळ हे वेंगळे वरचीवाडी शाळेचे माजी विद्यार्थी असून, आपल्या मातृशाळेशी असलेले नाते त्यांनी या सेवाभावी कार्यातून पुन्हा दृढ केले.
कार्यक्रमाला शिक्षक संजय संकपाळ, बाळकृष्ण कदम, गणेश पडवळ, माधव शिंदे, तसेच अंगणवाडी सेविका अशोक पाटील आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बाळकृष्ण कदम सर यांनी संस्थेच्या सामाजिक जाणीवपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून मदतीचा हात देणारे हे तरुण समाजासाठी प्रेरणादायी आहेत.” त्यानंतर गणेश पडवळ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शिक्षणातील अडथळे दूर करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या “सेवेचे ठायी तत्पर” या तरुणांच्या संस्थेचा हा उपक्रम समाजातील संवेदनशीलतेचे आणि शिक्षणप्रेमाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
Comments
Post a Comment