जिल्ह्यात प्लास्टिक कचरा बंदी मोहिमेला गती
जिल्ह्यात प्लास्टिक कचरा बंदी मोहिमेला गती
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे स्पष्ट निर्देश – उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू
✍️विजय जाधव ,
सातारा प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत प्लास्टिक कचरा बंदी उपक्रमाची अंमलबजावणी कडकपणे सुरू झाली आहे. जिल्ह्यात उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरू असून यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथके सक्रिय झालेले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सर्व ग्रामपंचायतींना आदेश दिले आहेत की –
- गावालगतचे रस्ते, महामार्गाच्या कडेला, नदीघाट व सार्वजनिक ठिकाणी विखुरलेला कचरा त्वरित संकलित करावा.
- त्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास संबंधित ग्रामपंचायती जबाबदार धरल्या जातील.
- ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो, तेथे CCTV बसवून कचरा टाकणाऱ्यांवर दंड आकारावा.
- हागणदारीमुक्त मोहिमेसारखीच रात्रगस्त घालून कचरा टाकणाऱ्यांना रंगेहात पकडण्याची व्यवस्था करावी.
त्यांनी प्रत्येक कुटुंबाने एकल प्लास्टिकचा वापर बंद करून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले. “घरातील प्लास्टिक ग्रामपंचायतीच्या संकलन प्रणालीद्वारे जमा करावे,” असे त्या म्हणाल्या.
प्लास्टिक निर्मूलनासाठी सामूहिक सहभाग
ग्रामस्थ, महिला बचतगट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, तसेच ग्रामस्तरीय कर्मचारी यांच्या मदतीने रस्त्यालगत, पुलाखाली, बसस्थानके, शाळा परिसर, टोलनाके इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रभावी अंमलबजावणीची उदाहरणे
या आदेशांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठोस कारवाई सुरू झाली आहे –
- कराड तालुका, वारुंजी येथे एकल प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर छापे टाकून तब्बल ₹२४,००० दंड वसूल करण्यात आला.
- गोटे गावात व्यापाऱ्यांकडून ₹९,००० दंड आकारण्यात आला.
या कारवाईत गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रसाद खेडेकर, पूनम पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दीपक हिनुकले, जया साळुंखे यांनी सहभाग घेतला.
याचबरोबर जावली तालुक्यातील बिभवी गावात गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानदारांना प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी सरपंच संतोष बांदल, उपसरपंच कांताराम शिंदे, विस्तार अधिकारी सौरभ टूभे, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत कोळी, स्वच्छता समन्वयक संतोष जाधव व मनोज खेडकर उपस्थित होते.
ब्लॅक स्पॉट ओळख – थेट दंड
जिल्हा स्तरावरील तज्ञ अजय राऊत, राजेश भोसले, नीलिमा सनमुख यांनी वाढेफाटा, वर्ये, सैदापूर, कोंढवे, रामनगर, समर्थ नगर, कोडोली, खेड परिसरात पाहणी करून ‘ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित केले आहेत. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून थेट दंड वसूल करण्यात येणार आहे.
दंडात्मक कारवाईला गती
पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने भोसले यांनी सांगितले की –
“जिल्ह्यात उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. ही मोहीम सातत्याने राबविली जाणार असून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यास प्रशासन कटिबद्ध आहे.”
नागरिकांना आवाहन
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घंटागाडीतच कचरा टाकावा, उघड्यावर कचरा फेकू नये, एकल प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन केले आहे. या मोहिमेला सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment