महाबळेश्वर पालिका रणसंग्राम तापला नगराध्यक्ष पद खुलं – प्रचाराची ‘ऑक्टोबर हीट’ सुरू, विकासापेक्षा ‘आर्थिक समीकरणांचे’ राजकारण आघाडीवर
महाबळेश्वर पालिका रणसंग्राम तापला
नगराध्यक्ष पद खुलं – प्रचाराची ‘ऑक्टोबर हीट’ सुरू, विकासापेक्षा ‘आर्थिक समीकरणांचे’ राजकारण आघाडीवर
प्रेषित गांधी,
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीचा ताेरा आता खऱ्या अर्थाने रंगू लागला आहे. ऑक्टोबरच्या गुलाबी थंडीची चाहूल लागली असली तरी शहरातील राजकीय वातावरणात मात्र ‘ऑक्टोबर हीट’ जाणवू लागली आहे. यंदा अनेक वर्षांनंतर नगराध्यक्ष पद सर्वसाधारण (खुले) ठेवण्यात आले असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची, रोमहर्षक आणि चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे. आगामी काही दिवसांत या निवडणूक रणधुमाळीला अजून जोर चढणार यात शंका नाही.
नवीन-पूर्वीचे इच्छुक मैदानात – संपर्क मोहीम वेगात
नगरपरिषद निवडणुकीच्या वेळापत्रकाची उलटी गिनती सुरू आहे. शहरातील जुने-जाणते राजकीय चेहरे पुन्हा पुढे येऊ लागले असून त्यांच्यासोबत अनेक नवीन चेहरेदेखील इच्छुकांच्या रांगेत दिसत आहेत. शहरात ठिकठिकाणी काना-कोपऱ्यातील गाठीभेटी, ‘भेटीगाठी’ आणि लपून-छपून सुरू असलेल्या बैठका यामुळे राजकीय हालचालींना उधाण आले आहे. काही संभाव्य उमेदवारांनी तर सोशल मीडियावरून आपली उमेदवारीची अनौपचारिक घोषणा करून प्रचारही सुरू केला आहे.
विकासाचे प्रश्न मागे – ‘आर्थिक विकासा’चे (स्वतःचे) समीकरण पुढे
गेल्या काही वर्षांपासून महाबळेश्वरच्या विकासाचा आलेख चिंताजनक आहे. शहराच्या दीर्घकालीन विकासापेक्षा स्वतःची आर्थिक उभारणी व वैयक्तिक हितसंबंध जपणे याकडे अनेक लोकप्रतिनिधींचा कल वाढताना दिसतो. निवडणुकीत कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होत असल्याच्या चर्चा खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे ही निवडणूक सामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
मतदारांचा बदलता कल चिंताजनक
शहरातील नागरिकांमध्ये विकासाची अपेक्षा असली तरी मतदानातील स्वार्थी व्यवहार आता उघडपणे दिसू लागले आहेत. काही मतदार आपल्या प्रभागातील उमेदवारांकडून ‘सणासुदीच्या ऑफर्स’ किंवा वैयक्तिक गरजांची पूर्तता करून घेताना दिसतात. त्यामुळे निवडणुकीतील सत्त्व आणि पारदर्शकता धोक्यात आल्याची भावना नागरिकांमध्येही आहे. तरुण आणि सुशिक्षित वर्ग फक्त टीका करीत असून प्रत्यक्ष नेतृत्वाला पुढे येण्यास तयार नाही, ही बाब खेदजनक आहे.
राजकारणातील विचित्र समीकरणे – ‘मित्र म्हणजे शत्रू’ की ‘शत्रू म्हणजे मित्र’?
या निवडणुकीत राजकारणातील पारंपारिक समीकरणे कोलमडली आहेत. एकमेकांचे विरोधक म्हणून परिचित असलेले अनेक गट आता गुप्त समझोत्यांच्या माध्यमातून हातमिळवणी करत आहेत. ‘कोण कुणासोबत येईल आणि कोण कुणाला दगा देईल’ हे सांगणे कठीण झाले आहे. राजकारणात विरोधकांशी समझोता आणि मित्रपक्षांशी संघर्ष अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाबळेश्वरच्या विकासाचा मुद्दा अजूनही धुसर
महाबळेश्वर तालुक्यात तापोळा पर्यटन विकास, मुनावळे जल पर्यटन, जर्मन तंत्रज्ञानावर आधारित केबल स्टे पूल आदी विकास कामे सुरू असताना, महाबळेश्वर शहर मात्र वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पाणीटंचाई आणि अव्यवस्थित पर्यटन व्यवस्थापन या चिवट समस्यांमध्ये अडकलेले आहे. शहराचे नाव पर्यटन नकाशावर असले तरी विकासाच्या दृष्टीने आजही फक्त ‘थंड हवा’ हाच एकमेव ब्रँड उरला आहे.
शहराला हवे खंबीर नेतृत्व – ‘नगराध्यक्षा’कडेच अपेक्षा
महाबळेश्वरला खऱ्या अर्थाने दूरदृष्टी असणारे नेतृत्व आणि प्रामाणिक नगरसेवकांची टीम आज गरजेची आहे. येणारी निवडणूक ही केवळ सत्ता हस्तगत करण्याची स्पर्धा नसून शहराच्या भविष्याचा मार्ग निश्चित करणारी निर्णायक वेळ आहे.
ज्येष्ठ पत्रकार शिवरतन पल्लोड यांची चिंता
“महाबळेश्वरमध्ये न तोडणारे दुष्टचक्र निर्माण झाले आहे. हे चक्र फोडणारा अभिमन्यू निर्माण होईल का? शहराचे भविष्य वाचविण्यास कोणी पुढे येईल का? अन्यथा महाबळेश्वरला ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही.”
— शिवरतन पल्लोड, ज्येष्ठ पत्रकार
आगामी काही दिवसांत महाबळेश्वर नगरपालिका रणसंग्राम अधिक तापणार आहे. शहराच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. विकासाला न्याय देणारा पर्याय महाबळेश्वर मतदान करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Comments
Post a Comment