महाबळेश्वर तालुक्यात वन्यजीव हल्ल्यात चाळीस दिवसांत दुसरा मृत्यू; बिबट्याच्या वावरामुळे दहशत, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण



महाबळेश्वर तालुक्यात वन्यजीव हल्ल्यात चाळीस दिवसांत दुसरा मृत्यू; बिबट्याच्या वावरामुळे दहशत, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

जितेंद्र कारंडे, प्रतापगड प्रतिनिधी
महाबळेश्वर :
महाबळेश्वर तालुक्याची ओळख म्हणजे हिरवागार निसर्ग, धबधबे, डोंगररांगा आणि वन्यजीवांनी नटलेले रमणीय जंगल. पण हाच निसर्ग आता स्थानिक ग्रामस्थांसाठी भयावह ठरत असून, मागील चाळीस दिवसांत वन्यजीवांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे ग्रामीण भागात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाच्या निष्क्रिय कारभारावर संतापाचा उद्रेक होत आहे.

सोनाट येथील शेतकरी राघू कदम ठार

सोनाट येथील राघू जानू कदम (वय ५०) हे मंगळवार सकाळी नेहमीप्रमाणे शेतीकामासाठी गेले असता, अचानक शेतात आलेल्या रान गव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले.

वन्यजीवांपासून माणसांचे रक्षण कोण करणार?” — असा प्रश्न ग्रामस्थ आता संतापाने विचारत आहेत.

मागील घटनेची आठवण ताजी

याआधी ११ सप्टेंबर रोजी देवळी गावचे रहिवासी आनंद जाधव यांच्या दुचाकीवर चालता चालता माकडाने झेप घेतली होती. त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. फक्त चाळीस दिवसांच्या अंतराने पुन्हा एक बळी गेल्याने भीतीचे सावट आणखी दाट झाले आहे.

बिबट्याचा वावर; दहशत वाढली

भिलार, पांगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत असून, जनावरांवर हल्ले वाढले आहेत. रात्रीच्या वेळी कुत्रे, शेळ्या, जनावरे यांचा बळी घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत असून, महिलांमध्ये व मुलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त

डोंगराळ प्रदेशातील शेतकरी भात, नाचणी, बटाटा, फरशी गहू, वरी अशी पिके घेत असले तरी गेल्या काही वर्षांत गवे, रानडुक्कर, माकडे, साळींदर आणि आता बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान सहन करत आहेत. परिणामी, सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी शेती सोडली असून काहींनी शहरांकडे स्थलांतर केले आहे. उरलेले ग्रामस्थ मात्र रोजच्या भीतीत जगत आहेत.

वनविभागावर नागरिकांचा आक्रोश

ग्रामस्थांचा आरोप आहे की, वनविभाग केवळ चौकशी आणि अहवालापुरता मर्यादित राहतो. प्रत्यक्ष उपाययोजना — जसे की कुंपण, सापळे, रात्रगस्त, जनजागृती — या काहीच प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत.
अनेकदा ग्रामस्थांनी लेखी तक्रारी दिल्या, पण त्यावर कारवाई झाल्याचे कोणतेही ठोस उदाहरण नाही.

ग्रामस्थांची मागणी :

  • गावाभोवती वन्यप्राण्यांच्या प्रवेशावर नियंत्रणासाठी कुंपण व्यवस्था करावी.
  • रात्रपाळीतील गस्त वाढवावी.
  • हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत द्यावी.
  • पीकनुकसानीबाबत भरपाई योजना तातडीने लागू करावी.
  • बिबट्या आणि रान गवे यांसारख्या प्राण्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवावेत.

निसर्गाचा आशीर्वाद की शाप?

पर्यटकांसाठी महाबळेश्वरचा निसर्ग म्हणजे आशीर्वाद — पण स्थानिकांसाठी तो आता शाप ठरत आहे. अनियमित हवामान, दर्डी कोसळण्याची शक्यता, रोजगाराचा अभाव आणि आता वन्यजीव हल्ले — या सर्व संकटांनी गावकऱ्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे.

आमच्या जीवाची किंमतही काही आहे का?” — असा जळजळीत सवाल आता सोनाट, तापोळा आणि देवळी परिसरातील प्रत्येक नागरिक विचारत आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस पावले उचलावीत, हीच ग्रामस्थांची आर्त मागणी आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl