भिलार परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, शेतकऱ्यांची चिंता वाढली

भिलार परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, शेतकऱ्यांची चिंता वाढली

विलास काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी :

भिलार परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बिबट्या आणि त्याचा बछडा हे दोघेही भरवस्तीत दिसल्याने नागरिक आणि शेतकरी अधिकच घाबरले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

भरवस्तीत बिबट्याचे वारंवार दर्शन
२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी भिलार येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात प्रथमच बिबट्या आणि त्याचा बछडा दिसल्याची नोंद झाली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबरला दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्या पुन्हा एकदा गावाच्या मध्यवस्तीतून फेरफटका मारताना ग्रामस्थांना दिसला. या घटनेने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. त्याच रात्री पुन्हा शाळेच्या पाठीमागे बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाल्याने भीतीचे सावट आणखी गडद झाले आहे.

स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांची वाढती चिंता
सध्या भिलार परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीचा हंगाम सुरू असून, अनेक शेतकरी रात्री-अपरात्री शेतात काम करत आहेत. अशा वेळी बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
“रात्री पिकाला पाणी देण्यासाठी किंवा काम पाहण्यासाठी शेतात गेल्यावर अचानक बिबट्या समोर आला, तर जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही,” असे स्थानिक शेतकरी सांगतात.

ग्रामस्थांकडून वनविभागाकडे मागणी
बिबट्याच्या या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. “या भागात शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिक दिवसभर फिरत असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. वनविभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात,” अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

वनविभागाकडून प्रतिसादाची प्रतीक्षा
ग्रामस्थांनी घटनेची माहिती स्थानिक वनअधिकाऱ्यांना दिली असली तरी अद्याप पिंजरा लावण्याची किंवा शोधमोहीम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. नागरिकांचा वनविभागावर नाराजीचा सूर असून, त्यांनी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

भिलारसारख्या पर्यटनस्थळी बिबट्याचा वावर वाढल्याने पर्यटकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहून गाव व परिसर सुरक्षित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची एकमुखी मागणी आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl