महाबळेश्वर तालुका जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक : भिलार गटात उमेदवारांची हालचाल वेगवान, राजकीय समीकरणे उलटफेराच्या मार्गावर


महाबळेश्वर तालुका जिल्हा परिषद – निवडणूक : भिलार गटात उमेदवारांची हालचाल वेगवान, राजकीय समीकरणे उलटफेराच्या मार्गावर

जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी – 

आगामी जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती (PS) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण धगधगू लागले आहे. विशेषतः भिलार गटात इच्छुक उमेदवारांची हालचाल वेगाने सुरू असून गावभेटी, सामाजिक कार्यक्रमात सहभाग, जनसंपर्क मोहीमा आणि विकासाच्या घोषणांमुळे निवडणूक वातावरण तापू लागले आहे. या गटातील जागा अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षित असल्याने योग्य व वैध जातीच्या दाखल्यांचा प्रश्न उमेदवारांना मोठा अडथळा ठरत आहे.

 महायुती की ‘माझी युती’ – संभ्रम कायम!

तालुक्यात महायुतीची अधिकृत घोषणा अद्याप न झाल्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्येच स्पर्धा होण्याची शक्यता आहे. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप या तीनही पक्षांनी स्वत:च्या उमेदवारांची चाचणी सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर मतदारसंघात पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.

दरम्यान आरपीआयच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे –
“महायुतीसोबत चर्चा सुरू आहेत. सकारात्मक निकाल लागल्यास महायुतीसोबत राहू, अन्यथा स्वतंत्र लढण्यास तयार आहोत,” असा इशारादायक इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे महायुतीच्या समीकरणात अजून अनिश्चितता निर्माण झाली आहे.


वैध एसटी दाखल्यांची टंचाई – मोठी अडचण

भिलार गट हा अनुसूचित जमात (एसटी) राखीव असल्याने उमेदवाराकडे व्हॅलिड जात प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक आहे. तालुक्यात महादेव कोळी समाजाचे मोठे अस्तित्व असूनही वैध दाखल्यांची टंचाई दिसून येत आहे, ज्यामुळे अनेक संभाव्य उमेदवारांची गळचेपी होताना दिसत आहे.

 प्रमुख इच्छुक उमेदवारांच्या चर्चेतली नावे

 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

संजय केळगणे (भेकवली) – संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे 13 वर्ष अध्यक्ष, अनुभवी सामाजिक कार्यकर्ते.

पंढरीनाथ लांगी (क्षेत्र महाबळेश्वर) – विकासकामात सातत्य, स्थानिकांमध्ये लोकप्रियता.

दादा धामूणसे (कासवंड) – सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चांगली पकड.


 या तिघांकडे वैध एसटी दाखले नसल्याच्या चर्चा असून त्यांच्या उमेदवारीवर संभ्रम आहे.

सुरेश सपकाळ (माजी ZP सदस्य) – अनेक पक्षांकडून संपर्क, रणनीतीत तरबेज. रायगड जिल्ह्यातील मूळ वास्तव्यामुळे त्यांचा दाखला वैध ठरू शकतो.

सचिन सपकाळ (कुंभरोशी) – पूर्वी ग्रामपंचायत सदस्य. राष्ट्रवादी नेते राजूशेठ राजपुरे यांचे खंदे समर्थक. त्यांचे मुळगाव रायगड जिल्ह्यात असल्याने जातीचा दाखला वैध असून तिकीटासाठी प्रभावी दावेदार म्हणून नाव पुढे येत आहे.

ज्योती जाधव (माजी ZP अध्यक्षा) – अनुभवी  असूनही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.


भारतीय जनता पार्टी (भाजप)

भाजपने देखील जोरदार तयारी सुरू केली असून पुढील नावे इच्छुकांच्या चर्चेत:

अजय कदम (टेकवली)

अनिल लांगी (क्षेत्र महाबळेश्वर)

तुळशीराम केळगणे (भेकवली)
भाजप स्थानिक संघटनशक्तीवर भर देत असून स्वबळाची तयारी केल्याचे संकेत मिळत आहेत.


महाविकास आघाडी

महाविकास आघाडीकडून (शिवसेना उद्धव गट – काँग्रेस – शरद पवार गट राष्ट्रवादी) अजून स्पष्ट उमेदवारांचे नाव जाहीर झालेले नाही. मात्र "जिंकण्याजोगा आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार" देण्याच्या भूमिकेत आघाडी असल्याचे कळते. त्यामुळे या गटातून सध्या बैकफूटवरून रणनीती आखली जात आहे. परंतु राजकीय स्थिती पाहता उमेदवार मिळणे अवघड असल्याचे जाणवते.

 स्थानिक उमेदवारांना वैधतेचा आधार?

धरती–आभा योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने आदिवासी समाजासाठी गावोगावी जात दाखला वितरण आणि पडताळणी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे महादेव कोळी समाजातील स्थानिक इच्छुकांना वैध दाखले मिळण्याची शक्यता वाढली असून भिलार गटात अंतिम क्षणी अनेक नवी नावे समोर येऊ शकतात.


---
 भिलार गट – निवडणुकीचा "हॉटसीट"

मुद्दा स्थिती

आरक्षण अनुसूचित जमात (एसटी)
प्रमुख मुद्दे स्थानिक विकास, जंगलहक्क, पाणी, उद्योग-पर्यटन, शिक्षण
राजकीय स्थिती सर्वच पक्षांत उमेदवारांची स्पर्धा
मुख्य वाद वैध जात दाखल्यांचा प्रश्न


महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गटाची निवडणूक ही फक्त मतदानाची लढत नसून राजकीय अस्तित्वाची चुरस ठरणार आहे. महायुती विरुद्ध आघाडी असा सामना रंगणार की महायुतीतीलच अंतर्गत संघर्ष तीव्र होणार, हे काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित – भिलार गटातील ही लढत जिल्हाभर चर्चेचा विषय ठरणार आहे.


---

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl