राष्ट्र घडविण्याचे काम शिक्षक करतो — किशोरभाई धारिया यांचे प्रतिपादनअविष्कार फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पोलादपूर येथे उत्साहात संपन्न
राष्ट्र घडविण्याचे काम शिक्षक करतो — किशोरभाई धारिया यांचे प्रतिपादन
अविष्कार फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पोलादपूर येथे उत्साहात संपन्न
प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी :
पोलादपूर : “शेतकरी जसा शेतीची मशागत करून अन्नधान्य निर्माण करतो, तसाच शिक्षक संस्कारांची मशागत करून राष्ट्रनिर्मिती घडवितो. पिढी घडविण्याचे हे कार्य शिक्षक करत असल्याने राष्ट्र घडविण्यात शिक्षकाची भूमिका अनन्यसाधारण आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन हिरवळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई धारिया यांनी केले.
पोलादपूर येथील विक्रमराव मोरे सभागृहात अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन इंडिया, जिल्हा शाखा रायगड यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
किशोरभाई धारिया पुढे म्हणाले, “शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसावे. शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, जबाबदारी आणि सुसंस्कार निर्माण व्हायला हवेत. देश आर्थिकदृष्ट्या प्रगत झाला तरी नागरिक आनंदी नसतील, तर त्या प्रगतीचा काही उपयोग नाही. समाजातील भावनिक आणि नैतिक समृद्धी ही शिक्षकांच्या कार्यातूनच साध्य होते. त्यामुळे शिक्षक हा समाजातील सर्वात मोठा परिवर्तनकर्ता आहे.”
अविष्कार फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करताना धारिया यांनी सांगितले की, “ही संस्था केवळ राज्यापुरती मर्यादित नसून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे, ही अभिमानाची बाब आहे.”
कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, “अविष्कार फाउंडेशनकडून समाजातील विविध क्षेत्रांत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येत आहे. शिक्षक, पत्रकार, सरपंच, समाजसेवक, कर्मचारी यांना गौरविणे म्हणजे समाजातील मूल्यव्यवस्था दृढ करणे होय. अशा संस्थांनी पुढाकार घेऊन प्रेरणादायी कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे.”
या सोहळ्यात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त : ज्ञानेश्वर सावंत, अखलात गोडामे, महादेव पवार.
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त : गीतांजली साळवी, दीपक सकपाळ, रंजना कदम, गीता गोळे.
समाजरत्न पुरस्कार : ॲड. दत्ताराम शिंदे.
गुरुमाऊली सेवा गौरव कार्य पुरस्कार : ह.भ.प. गणपत मोराणकर अजरेकर वारकरी संप्रदाय, चंदन पाटील, नंदकुमार ठाकूर (पेण).
समाज भूषण पुरस्कार : यशवंत मोरे (कापडे).
पत्रकार पुरस्कार : सुनील राजभर (माणगाव).
आदर्श सरपंच पुरस्कार : लता करंजे (मानदंड तळा).
गुणवंत कर्मचारी पुरस्कार : धनराज गोपाळ, संतोष जंगम, दीपक धेंडे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. संतोष भोसले, कोकण विभागीय अध्यक्ष संदीप नागे, रायगड जिल्हा अध्यक्ष शंकर शिंदे, आयोजक सोपान चांदे, किशोर मोहिते, ज्ञानेश्वर सावंत, ॲड. दत्ताराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या गोड व शानदार कार्यक्रमाचे आयोजन अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोपान चांदे, शिक्षक नेते परशुराम मोरे, नाना जाधव, महादेव मदने, सचिन दरेकर, रूपाली जाधव, नीता मदने यांच्या प्रयत्नातून झाले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी उतेकर आणि सचिन दरेकर यांनी केले.
शेवटी उपस्थित मान्यवरांनी अविष्कार फाउंडेशनच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment