नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा – पालकमंत्री शंभूराज देसाई प्रतापगड पर्यटनाला नवी चालना मिळण्याची शक्यता
नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
प्रतापगड पर्यटनाला नवी चालना मिळण्याची शक्यता
जितेंद्र कारंडे ,
प्रतापगड प्रतिनिधी – दि. 27 :
ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात ‘नमो पर्यटन सुविधा केंद्र’ उभारण्यात येणार असून, या केंद्रासाठी तातडीने जागा निश्चित करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई यांनी या प्रकल्पासंबंधी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात उपस्थित होते.
प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी महसूल व वन विभागाची जागा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. महसूल विभागाची जागा अपुरी असल्यास वन विभागाची जागा तातडीने निश्चित करावी, तसेच वन विभागाने बांधकामासाठी आवश्यक ‘नहरकत प्रमाणपत्र’ (NOC) लवकर मिळवावे, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
पर्यटन विभागाचे अधिकारी जागा पाहणीसाठी लवकरच प्रत्यक्ष भेट देतील. जागा अंतिम झाल्यानंतर तत्काळ कामांची निविदा प्रक्रिया राबवून सुविधा केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात येईल, अशी माहितीही देसाई यांनी बैठकीत स्पष्ट केली.
प्रतापगड किल्ल्यावर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र सध्या पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नमो पर्यटन सुविधा केंद्र उभारले गेल्यास पार्किंग, माहिती केंद्र, स्वच्छतागृहे, सुटका गृहे, प्राथमिक वैद्यकीय सुविधा, तसेच विविध पर्यटक सेवा एकाच छताखाली उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रतापगडच्या पर्यटनाला नवी ऊर्जितावस्था मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment