जगातील खरी संपत्ती पैसा नव्हे, तर ज्ञान – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
जगातील खरी संपत्ती पैसा नव्हे, तर ज्ञान – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
सातारा प्रतिनिधी :
पैसा म्हणजे संपत्ती नाही; जगातील खरी संपत्ती म्हणजे ज्ञान, असा ठाम विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, जग खूप वेगाने पुढे चालले आहे, त्यामुळे ज्ञान अद्ययावत असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंमलात आणलेले नवीन शैक्षणिक धोरण याच उद्देशाने आहे की, ज्ञान बहुउद्देशीय असावे आणि त्यातून कौशल्य विकास साधला जावा. यामुळे व्यक्ती सर्वांगीण विकसित होईल आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल.
या प्रसंगी पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटी व बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र यांच्या नवीन अभ्यासक्रमांचा, अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचा आणि विस्तारित इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उद्घाटन स्वयं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमात आमदार डॉ. अतुल भोसले, सत्यजितसिंह पाटणकर, अमित कुलकर्णी, अमरसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, हिंदूराव पाटील, राजाभाऊ शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यक्तीने जीवनातील स्पर्धा ज्ञानाशी करावी, कारण ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे. स्टार्टअप इंडियामध्ये भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. देशाकडे बुद्धिमत्ता आहे, फक्त योग्य आधाराची गरज आहे. जगभरातील अनेक आघाडीच्या कार्पोरेट कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले की, राज्य शासनाने आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील वस्तीगृहांना मोठ्या प्रमाणात मदत दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची प्रास्ताविका संजीव चव्हाण यांनी केली, सूत्रसंचालन प्रा. दीपक डांगे यांनी केले तर आभार एस. डी. पवार यांनी मानले.
उद्घाटनानंतर कौशल्य विकास केंद्रातील प्रशिक्षण आणि प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव देतील. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल, तसेच त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी सज्ज करता येईल. कार्यक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानावर आधारित विकासाची आवड निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment