पंचायत समिती महाबळेश्वर निवडणूक : मेटगुताड गणात ओबीसी महिला आरक्षणाने उलथापालथ, तिकीटासाठी इच्छुकांची रांग
पंचायत समिती महाबळेश्वर निवडणूक : मेटगुताड गणात ओबीसी महिला आरक्षणाने उलथापालथ, तिकीटासाठी इच्छुकांची रांग
✍️ जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी – माझं गाव माझी बातमी
महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून मेटगुताड गणात यंदा ओबीसी (मागास प्रवर्ग) महिला आरक्षण लागू झाल्याने स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. मागील पंचवार्षिकीत या गणातून निवडून गेलेले माजी सभापती संजय गायकवाड यांना यंदाच्या आरक्षण फेरबदलाचा फटका बसला असून त्यांना या गणातून निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे या गणातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
सभापती पदाच्या रेसमुळे गणाचे महत्त्व दुपटीने वाढले
यंदा महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी ओबीसी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे मेटगुताड गणातून निवडून येणाऱ्या प्रतिनिधीला सभापती पदाच्या शर्यतीत उतरण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे या गणावर सर्वच प्रमुख पक्षांचे विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये तिकीटाची चुरस
या गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मजबूत मानला जात असून पक्षात तिकीट मिळवण्यासाठी उत्सुकांची रांग लागली आहे.
तर संभाव्य उमेदवारांमध्ये पुढील नावे चर्चेत आहेत :
| शकुंतला रमेश चोरमले | |
|---|---|
| करुणा प्रदीप कात्रट, गीतांजली सुनील संकपाळ आफशा मुनवर वरुणकर, सारिका राजू पुजारी, प्रियांका रवींद्र ढेबे स्वाती धनेश वाडेकर |
|
| सौ....... राजेंद्र ढेबे | |
| स्वाती सुनील जंगम |
या सर्वांनी ग्रामपातळीवर संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघात घर भेटी, बैठकांद्वारे संवाद, तसेच महिला मतदारांशी संपर्क मोहीम सुरू झाली आहे.
राजकीय समीकरणे गुंतागुंतीची
मेटगुताड गणात ओबीसी समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून निवडणुकीत समाजाधारित ध्रुवीकरण होण्याची चिन्हे आहेत. या गणात राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेटवर्कचा मोठा प्रभाव आहे, तर गायकवाड गट देखील संघटनेच्या जोरावर कार्यरत आहे. हे दोन्ही गट जर एकत्र आले तर विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.
शिवसेना आणि भाजप देखील मांडणार जोरदार दावेदारी
या गणात एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट मजबूत असला तरी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) सुद्धा उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तर भाजप देखील मेटगुताड गणाला प्राधान्य देत असून संघटन स्तरावर पक्षकार्य गतीमान झाले आहे.
महाविकास आघाडीची बैठक ठरणार निर्णायक?
महाबळेश्वर तालुक्यातील महाविकास आघाडीची उद्या होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) एकत्र लढणार की स्वतंत्र – यावर निर्णय होणार आहे.
मेटगुताड गणाचे वैशिष्ट्य
- हा गण आर्थिकदृष्ट्या सक्षम मानला जातो
- महाबळेश्वर शहरालगत असल्याने विकासाचा वाहता प्रवाह
- पर्यटनाशी निगडित व्यवसायाचा प्रभाव
- क्षेत्र महाबळेश्वर, गोरेघर, मेटगुताड, भेकवली, माचुतर , नकिंदा या सक्षम ग्रामपंचायत्यांचा समावेश
- संघटनदृष्ट्या बलाढ्य नेते आणि अनेक राजकीय गट सक्रिय
निवडणूक समीकरणे दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत आहेत. पक्षांतर, गटबाजी, समाजआधारित गणिते आणि आर्थिक बळ यावर अंतिम लढतीची दिशा अवलंबून राहील, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मेटगुताड गणातील निवडणूक ही केवळ स्थानिक नसून प्रतिष्ठेची आणि प्रभावाची लढत ठरणार आहे.
Comments
Post a Comment