मांघर शाळेच्या रोपवाटिकेला वनविभागाचे दत्तकत्व फणसाच्या रोपांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम
मांघर शाळेच्या रोपवाटिकेला वनविभागाचे दत्तकत्व
फणसाच्या रोपांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम
रवी चव्हाण,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
“झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणेला वास्तवात उतरवत मांघर केंद्रातील जिल्हा परिषद शाळेने पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श निर्माण केला आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी फणसाची रोपवाटिका तयार केली असून तब्बल दोनशे रोपे मुलांनी स्वतःच्या हातांनी वाढवली आहेत.
वन्यजीव सप्ताहानिमित्त महाबळेश्वर वनविभागाने या उपक्रमाचा गौरव करत दीडशे रोपे दत्तक घेतली. या रोपांची लागवड योग्य ठिकाणी करून त्यांची देखभाल केली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल मा. श्री. महादेव मोहिते यांनी दिली. “आपण वाढवलेली रोपे आता जंगलाचा भाग बनतील, हा मुलांसाठी अभिमानाचा क्षण आहे,” असेही त्यांनी सांगितले.
रोपे वनविभागाच्या वाहनात भरताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत क्षणभर अश्रू तरळले, पण त्याचवेळी ही रोपे उद्या मोठी झाडे बनतील या आनंदाने त्यांची मने भरून आली.
या प्रसंगी गटविकास अधिकारी मा. विजय विभुते यांनी सांगितले की, “जंगले वाचली, वाढली तरच जीवसृष्टी टिकेल. अन्नसाखळी सुरक्षित राहील आणि वन्य प्राणी मानवी वस्तीत येणार नाहीत.”
गटशिक्षणाधिकारी मा. रमेश गंबरे यांनी शाळेतील पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, “मुख्याध्यापक अनिल जाधव गुरुजी, इनामदार सर व सगर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करून वृक्षारोपणाचे महत्त्व मनावर बिंबवले आहे. असा आदर्श इतर शाळांनी घ्यावा.”
शाळेचे मुख्याध्यापक अनिल जाधव यांनी सांगितले की, “मांघर केंद्रातील इतर शाळांनाही या रोपवाटिकेतून फणसाची रोपे देण्यात येणार आहेत.”
या उपक्रमासाठी विस्तार अधिकारी मा. सुरेंद्र भिलारे, राम जगताप, सुनील पार्टे, सुनील चिकणे, सरपंच मा. गणेश जाधव, केंद्र प्रमुख चंद्रकांत जंगम, दगडू ढेबे व संजय पार्टे आदी मान्यवरांनी वेळोवेळी रोपवाटिकेस भेट देऊन योग्य मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
या सोहळ्यात वनपाल मा. सुनील लांडगे, वनरक्षक श्री. मराडे, श्री. निकम, श्री. रुपनर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मा. नाना जाधव, संतोष जाधव, संजय जाधव, रवी पवार तसेच सर्व पालकांनी सहकार्य केले.
या उपक्रमातून मांघर शाळेने पर्यावरण संवर्धनाबरोबरच “विद्यार्थी म्हणजे उद्याचे जबाबदार नागरिक” ही संकल्पनाही अधोरेखित केली आहे. फणसाच्या या लहानशा रोपवाटिकेतून हिरवळ वाढवण्याचा मोठा संदेश संपूर्ण परिसरात पसरला आहे. 🌱
Comments
Post a Comment