राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पोलीस विभागाच्यावतीने ‘एकता दौड’ उत्साहात पारदेशाच्या प्रगतीसाठी ऐक्य आणि बंधुत्व गरजेचे – पोलीस अधीक्षक तुषार दोशी
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पोलीस विभागाच्यावतीने ‘एकता दौड’ उत्साहात पार
देशाच्या प्रगतीसाठी ऐक्य आणि बंधुत्व गरजेचे – पोलीस अधीक्षक तुषार दोशी
✍️ विजय जाधव ,
सातारा प्रतिनिधी :
सातारा, दि. 31 :
“देशाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरिकांमधील एकता आणि परस्पर विश्वास. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्या प्रकारे देशातील विविध संस्थाने एकत्र आणून अखंड भारताची पायाभरणी केली, ती आज प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सातारा जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने भव्य ‘एकता दौड’ (Unity Run) आयोजित करण्यात आली. सकाळी सातारा पोलीस मुख्यालयातून सुरुवात झालेली ही दौड पोवई नाका – पोलीस कवायत मैदान या मार्गावरून मोठ्या उत्साहात पार पडली.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपपोलीस अधीक्षक (गृह) अतुल सबणीस, तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दौड दरम्यान “एक भारत, श्रेष्ठ भारत”, “जय जवान जय किसान”, “वंदे मातरम” अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गाणी, घोषवाक्ये आणि विविध फलक घेऊन देशातील एकता, अखंडता आणि सौहार्द यांचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस कवायत मैदानावर झालेल्या समारोप प्रसंगी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की,
“सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा घेऊन सामाजिक सौहार्द, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची गरज आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जसे पोलीस दल सज्ज आहे, तसेच नागरिकांनीही देशहितासाठी एकजुटीने उभे राहावे.”
एकता दौडच्या आयोजनामुळे सातारा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही ठिकठिकाणी उभे राहून दौडीत सहभागी पोलिसांना प्रोत्साहन दिले.
राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने घेतलेली ही ‘एकता दौड’ समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा, देशप्रेम आणि ऐक्याचा संदेश देणारा उपक्रम ठरला.
Comments
Post a Comment