पोलादपूर येथे 500 बांधकाम कामगारांना भांडी सेट वाटप : शासकीय योजनेचा लाभ शिवसेनेच्या माध्यमातून
प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री सन्माननीय भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकाराने आणि महाड विधानसभा क्षेत्रांतर्गत पोलादपूर तालुक्यातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगारांना शासकीय योजनेचा थेट लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील 500 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 18 हजार रुपयांच्या किमतीचे भांडी सेट वाटप करण्यात आले.
हा भव्य कार्यक्रम विक्रमराव मोरे सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पोलादपूर तालुका नेते, दक्षिण रायगड संपर्कप्रमुख तसेच माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
शासकीय योजनेंतर्गत बांधकाम कामगार, कारागीर, हेल्पर, मजूर पुरवठादार तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित विविध तज्ञ सहाय्यक यांची नोंदणी करून त्यांना वेगवेगळ्या टप्प्यांतून योजनांचा लाभ दिला जात आहे. शिवसेना बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील सुमारे २,५०० कामगारांची नोंदणी पूर्ण झाली असून अजूनही नोंदणीचे काम विविध ठिकाणी सुरूच आहे. आगामी काळात उर्वरित सर्व लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने योजनांचा लाभ मिळणार असल्याचे बांधकाम कामगार युनिटकडून सांगण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश बांधकाम क्षेत्रातील मजूर व कारागीर यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे तसेच त्यांच्या कुटुंबांना आधार मिळवून देणे हा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने विकास नलावडे, प्रसाद पवार, विक्रम भिलारे आदी पदाधिकारी यांनी केले.
🔸 कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ लाभ वाटपापुरतेच मर्यादित न राहता कामगारांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी सतत प्रयत्न सुरू राहणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment