साताऱ्यात ‘बेटी बचाव-बेटी पढ़ाव’ योजनेत शंभर टक्के निधी प्रभावी वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
साताऱ्यात ‘बेटी बचाव-बेटी पढ़ाव’ योजनेत शंभर टक्के निधी प्रभावी वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
सातारा प्रतिनिधी :
बेटी बचाव-बेटी पढ़ाव योजनेत मिळालेला निधी शंभर टक्के प्रभावीपणे खर्च करावा, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी दिली. योजनेच्या माध्यमातून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने प्रभावी कार्यक्रम राबवावेत, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित बेटी बचाव-बेटी पढ़ाव जिल्हास्तरीय टास्क फोर्स बैठकीचे अध्यक्षत्व जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले. बैठकीत महिला व बाल विकास अधिकारी राजश्री बने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) नागेश ठोंबरे, पर्यवेक्षक अधिकारी तुषार सुरत्राण, संरक्षण अधिकारी अजय सपकाळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी गर्भनिदान प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून आरोग्य विभागाच्या मदतीने शिबिरे, चर्चासत्रे आणि विविध जनसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर भर देण्यात आला.
श्री. पाटील यांनी जिल्हा महिला व बाल विकास विभागाने योजनेची नवनवीन कल्पनांद्वारे प्रभावी अंमलबजावणी करावी, असे सांगितले. यासाठी आराखडा तयार करावा, तज्ज्ञ व्यक्तींकडून जिंगल्स, व्हिडीओ आणि प्रचार साहित्य तयार करावे. जिल्ह्याच्या शेवटच्या घटकांपर्यंत या योजनेची प्रभावी प्रसिद्धी व प्रचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
त्याचबरोबर, बाल विवाह टाळण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यातील बाल गृहांमध्ये मुलांना आवश्यक सोयी-सुविधा मिळत आहेत का याची नियमित पाहणी करण्याचे सूचनाही त्यांनी दिले. तसेच, जर अतिरिक्त सुविधा आवश्यक असतील, तर त्या सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या या सूचनांमुळे जिल्ह्यात बेटी बचाव-बेटी पढ़ाव योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मार्ग सुकर होईल आणि मुलींच्या सुरक्षितता, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी कार्यक्षमता वाढेल, अशी अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment