प्रतापगड येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
प्रतापगड येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
प्रतापगड प्रतिनिधी (जितेंद्र कारंडे)
भारताचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” या विशेष आरोग्य मोहिमेचा लाभ महाबळेश्वर तालुक्यातील महिलांनाही मिळत आहे. या अभियानाचा उद्देश महिलांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण करून प्रत्येक कुटुंब आरोग्यदायी ठेवणे हा असून, ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभर राबवली जात आहे.
या अनुषंगाने, दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रा. आरोग्य केंद्र तळदेव अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कुंभरोशी – १ मार्फत प्रतापगड येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शिबिरात महिलांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, क्षयरोग तपासणी अशा गंभीर आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच गरोदर मातांची तपासणी, पोषण आहार सल्ला, आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना विमा कार्ड संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
गावातील मुलींचीही आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर पोषण आहार दिवस साजरा करून संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सदर कार्यक्रमाला मा. श्री विजय देशमुख (आरोग्य सहाय्यक, पंचायत समिती महाबळेश्वर) यांनी भेट देऊन शिबिराची माहिती घेतली व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य सेवक श्री. तेजस रणपिसे, आरोग्य सेविका श्रीमती स्वराली येवले, आशा सेविका साधना झाडे आदी उपस्थित होते.
गावकऱ्यांनी या शिबिराचे स्वागत करत, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याविषयीची जागरूकता वाढविण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
Comments
Post a Comment