महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयात सेवा पंधरवडा संदर्भात बैठक संपन्न
महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयात सेवा पंधरवडा संदर्भात बैठक संपन्न
महाबळेश्वर प्रतिनिधी (राजेश सोंडकर)—
महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयात ‘सेवा पंधरवडा’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन मस्के यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शासनाच्या सूचनेनुसार नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर हा उपक्रम राबविण्यात येत असून, याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीदरम्यान तहसीलदार मस्के यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, सर्व शासकीय योजना व सेवांचा लाभ पात्र नागरिकांना वेळेत मिळाला पाहिजे. विशेषतः जात, रहिवासी, उत्पन्न अशा प्रमाणपत्रांसह शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांबाबत कोणतीही विलंबता होऊ नये. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करणे हे प्रत्येक विभागाचे प्राधान्य ठरावे, असे त्यांनी सांगितले.
सेवा पंधरवड्यात तहसील कार्यालय, महसूल मंडळ कार्यालये तसेच पंचायत समिती पातळीवर विविध जनजागृती उपक्रम, शिबिरे व नोंदणी मोहिमा घेण्यात येणार असल्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.
बैठकीला मंडळ अधिकारी, तलाठी, लिपिक, पंचायत समितीचे अधिकारी व अन्य कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करणे आणि पारदर्शकता राखणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
तहसीलदार सचिन मस्के यांनी शेवटी आवाहन केले की, “सेवा पंधरवडा हा केवळ औपचारिकता म्हणून न राबवता तो प्रत्यक्षात नागरिकांच्या सेवेसाठी उपयुक्त ठरला पाहिजे. प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करून शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवाव्यात.”
Comments
Post a Comment