साताऱ्यात आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा; ग्रामविकासासाठी मंत्रीमंडळाची उपस्थिती
साताऱ्यात आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा; ग्रामविकासासाठी मंत्रीमंडळाची उपस्थिती
सातारा प्रतिनिधी , दि. 11 :
गावोगावी शाश्वत विकास साधण्यासाठी व ग्रामपंचायती स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची उद्दिष्टे, भूमिका व प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन साताऱ्यात करण्यात आले आहे.
या कार्यशाळेस राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत मंत्रीमंडळाच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यातील पंचायत व ग्रामविकास कामकाजाला नवी दिशा मिळणार आहे.
कार्यशाळेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे, रूपरेषा, अमलबजावणीची प्रक्रिया, तसेच पंचायत व ग्रामस्तरावर हाती घेण्यात येणारे उपक्रम या सर्व बाबींवर सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. सहभागींसाठी प्रभावी नियोजन, जबाबदाऱ्या निश्चित करणे, कार्यपद्धती आणि जनसहभागाचे महत्त्व या मुद्द्यांवर तज्ज्ञांकडून प्रशिक्षण सत्रे घेतली जाणार आहेत.
या उपक्रमात नेहरू युवा केंद्र, भजनी मंडळ, वारकरी मंडळ, पाणी फाउंडेशन, समाज प्रबोधन संस्था तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ग्रामविकास व जनसहभागाच्या दृष्टीने या संस्थांचा वाटा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी आवाहन केले की, “या कार्यशाळेतून मिळणारे मार्गदर्शन व प्रशिक्षण गावोगावी विकासाची नवी वाट दाखवेल. अभियानाच्या खरी ताकदीसाठी लोकसहभाग आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येक संस्थेने सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.”
आजची ही कार्यशाळा सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
Comments
Post a Comment