घोणसापूर ग्रामस्थांचे श्रमदान उपक्रमगावकऱ्यांनी एकजुटीने केली पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता
घोणसापूर ग्रामस्थांचे श्रमदान उपक्रम
गावकऱ्यांनी एकजुटीने केली पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता
जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी :
गेल्या चार महिन्यांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घोणसापूर (ता. महाबळेश्वर) गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. दरड कोसळल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून गढूळ व गाळकट पाणी टाक्यांमध्ये जमा होत होते. परिणामी ग्रामस्थांना स्वच्छ पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
अलीकडेच पावसाने थोडी उसंत दिल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वच्छतेचे काम हाती घेतले. गावातील नागरिकांसह मुंबईतून चाकरमानी आलेल्या तरुणांनीही यात सक्रिय सहभाग नोंदवला. श्रमदानातून सर्व गाळ बाहेर काढून टाकी परिसरातील वाढलेले रान व झुडपेही साफ करण्यात आली. यामुळे टाकी परिसर पुन्हा एकदा स्वच्छ व सुस्थितीत आला आहे.
किल्ले मकरंदगडाच्या पायथ्याशी वसलेले घोणसापूर हे डोंगराळ भागातील गाव असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होतात. तरीही ग्रामस्थांनी अडचणींना न जुमानता श्रमदानाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना, मार्गी लावला.
गावातील ज्येष्ठांनी या उपक्रमाचे स्वागत करत तरुणांच्या सहभागाचे कौतुक केले. “एकजुटीने आणि श्रमदानाने कोणताही प्रश्न सोडवता येतो, याचा आदर्श घोणसापूरने घालून दिला आहे,” असे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे सूर ऐकायला मिळाले.
या उपक्रमामुळे आता गावकऱ्यांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार असून गावात एकात्मतेचे आणि परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण घालून दिले गेले आहे.
Comments
Post a Comment