सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची 'व्हाट्सॲप चॅट बॉट' सेवा सुरू
नागरिकांसाठी आपत्तीविषयक माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन
सातारा प्रतिनिधी :
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत नागरिकांना आपत्तीविषयक माहिती सहज आणि तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी 'व्हाट्सॲप चॅट बॉट सेवा' सुरू करण्यात आली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
या सेवेद्वारे जिल्हयातील नागरिकांना आपत्तीविषयक विविध महत्त्वपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार असून, प्रशासनाशी जोडले जाणे अधिक सोपे व पारदर्शक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या उपक्रमामुळे प्रशासनाचा वेग वाढेल, नागरिकांचा विश्वास दृढ होईल आणि आपत्ती काळात त्वरित निर्णय घेण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
📲 सेवा कशी वापरायची?
नागरिकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी 9309461982 या क्रमांकावर व्हाट्सॲप संदेश पाठवावा लागेल. त्यानंतर चॅट बॉटमार्फत उपलब्ध सुविधा पर्याय दिसतील आणि आवश्यक ती माहिती नागरिकांना त्वरित मिळेल.
🟢 पहिल्या टप्प्यात उपलब्ध सुविधा
'व्हाट्सॲप चॅट बॉट' सेवेत नागरिकांना सुरुवातीच्या टप्प्यात खालील 10 सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत :
- पर्जन्यमानाबाबत माहिती
- धरण पातळी तपशील
- नदी/पूल पाणी पातळी स्थिती
- रस्त्यांबाबत अद्ययावत माहिती
- हवामान अंदाज (IMD)
- महत्वाचे संदेश व सूचना
- नकाशे व लोकेशनविषयक माहिती
- आपत्ती दरम्यान काय करावे व काय करू नये याचे मार्गदर्शन
- आपत्कालीन संपर्क क्रमांक व हेल्पलाईन
- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती
📌 सेवेत सुधारणा करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे
ही सुविधा अधिक परिणामकारक करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय महत्त्वाचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांच्या सूचनांनुसार व तांत्रिक गरजेनुसार 'व्हाट्सॲप चॅट बॉट' सेवेत सातत्याने सुधारणा करण्यात येणार आहेत.
💬 जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
"डिजिटल युगात जिल्हा प्रशासनाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन सेवांचा दर्जा उंचावणे ही काळाची गरज आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचा 'व्हाट्सॲप चॅट बॉट' हा त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी या सुविधेचा प्रभावीपणे वापर करून प्रशासनाशी जोडून घ्यावे,"
असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
👉 या उपक्रमामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने डिजिटलायझेशनच्या दिशेने आणखी एक महत्त्वाची झेप घेतली असून, नागरिकांना आपत्ती काळात तात्काळ मदत व माहिती मिळविण्याचा सोपा मार्ग उपलब्ध झाला आहे.
Comments
Post a Comment