भात पिकावर निळे भुंगेरे किडीचा प्रादुर्भाव — शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

भात पिकावर निळे भुंगेरे किडीचा प्रादुर्भाव — शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

प्रतापगड वार्ताहर :
महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पारपार, कुमठे व परिसरातील इतर गावांमध्ये भात पिकावर निळे भुंगेरे किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. या किडीमुळे पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर येथील शास्त्रज्ञ तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी नुकतीच शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन केले.

यावेळी शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम व डॉ. मनीष सुषीर, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती शितल नांगरे, उपकृषी अधिकारी श्री. दीपक बोर्डे, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्री. रणजीत शिंदे व श्री. रोहन निगडे उपस्थित होते. या सर्व तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना निळे भुंगेरे किडीचे स्वरूप, त्याचे व्यवस्थापन व नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती दिली.

किडीचा प्रादुर्भाव व लक्षणे

सध्या पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असल्याने, दमट व ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण निळे भुंगेरे किडीच्या वाढीस पोषक ठरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. विशेषतः पाणी साचून राहणाऱ्या सखल भागात, जलप्लावित झालेल्या बांधांवर व जिथे मोठ्या प्रमाणात गवत उगवते, तिथे या किडीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम आढळतो व नंतर संपूर्ण शेतात पसरतो.

भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे तर अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते. प्रौढ भुंगेरे पाने खरवडून हरितद्रव्य खातात, तर अळ्या पाने गुंडाळून आतील भाग खातात. त्यामुळे पानावर समांतर पांढऱ्या रेषा तयार होतात, ज्या पुढे एकमेकांत मिसळून पांढरे चट्टे निर्माण करतात. कालांतराने हे चट्टे तपकिरी होऊन पाने करपल्यासारखी दिसतात.

 किड नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
डॉ. मनीष सुषीर यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, ही कीड विशेषतः पाणथळ जमिनीत जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे शेतात जास्त काळ पाणी साचू न देता निचऱ्याची काळजी घ्यावी. तसेच जास्त खतांचा वापर टाळावा. किड नियंत्रणासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी आवश्यक आहे. प्रादुर्भाव जास्त असल्यास पहिल्या फवारणीनंतर १० ते १२ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

डॉ. दर्शन कदम यांनी कृषी विद्यापीठांतर्गत तयार होणाऱ्या जैविक निविषाविषयी माहिती दिली व त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.

 कृषी विभागाचे आवाहन
मंडळ कृषी अधिकारी श्रीमती शितल नांगरे यांनी शेतकऱ्यांना भात खाचरामधील बांध तणविरहित ठेवण्याचे आवाहन केले, कारण या गवतावरही किड मोठ्या प्रमाणावर उपजीविका करते. उपकृषी अधिकारी दीपक बोर्डे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागातील विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक कृषी अधिकारी रणजीत शिंदे यांनी सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांचे आभार मानले.

 या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना निळे भुंगेरे किड ओळखणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व पिकाचे नुकसान कमी करण्यास मदत होणार आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl