महाबळेश्वरमध्ये पर्यटन माहिती केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी
महाबळेश्वरमध्ये पर्यटन माहिती केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी
महाबळेश्वर प्रतिनिधी (राजेश सोंडकर)–
महाराष्ट्राचे नंदनवन आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमधील बंद पडलेले पर्यटन माहिती केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी ‘ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’ या संघटनेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन संघटनेच्या वतीने महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्य लिपिक अबाजी ढोबळे यांना देण्यात आले. माहिती केंद्र सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील संघटनेकडून देण्यात आला आहे.
महाबळेश्वर हे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करणारे हिल स्टेशन असून, विविध पॉइंट्स, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे व निसर्गरम्य दृश्यांची माहिती देण्यासाठी नगरपालिकेने एक पर्यटन माहिती केंद्र उभारले होते. मात्र, नगरपालिकेच्या वाहनतळाच्या बांधकामादरम्यान हे केंद्र तात्पुरत्या स्वरूपात पेटीट लायब्ररी येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, पेटीट लायब्ररीच्या सुशोभीकरणाच्या कामानंतर हे केंद्र गेल्या चार वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “अलीकडेच महाबळेश्वरचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत करण्यात आला आहे. ही बाब अभिमानाची असली तरी, पर्यटनस्थळी अधिकृत माहिती केंद्र नसणे ही अतिशय खेदजनक बाब आहे. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची पर्यटन उलाढाल होत असते. अशा ठिकाणी पर्यटकांना योग्य व अधिकृत माहिती मिळावी यासाठी माहिती केंद्र सुरू करणे अत्यावश्यक आहे.”
येत्या दिवाळी पर्यटन हंगामापूर्वी हे केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
या प्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, उपतालुकाध्यक्ष अशोक मामा शिंदे, तसेच अरुण आप्पा शिंगरे आणि रफीक बडाणे उपस्थित होते.
Comments
Post a Comment