प्रतापगड मशाल महोत्सव : ऐन पावसातही तुफान गर्दी, ३६६ मशालींनी उजळला इतिहास
प्रकाश कदम/जितेंद्र कारंडे/राजेश सोंडकर
प्रतापगड प्रतिनिधी :
ऐन पावसात आणि प्रतिकूल हवामानातही हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री प्रतापगडावर पार पडलेला मशाल महोत्सव अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्यात ३६६ मशालींच्या तेजाने संपूर्ण गड उजळून निघाला, तर "जय भवानी – जय शिवाजी"च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला.
सन २०१० पासून चंद्रकांत आप्पा उतेकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेला मशाल महोत्सव गेली सोळा वर्षे अखंडितपणे पार पडत आहे. यंदा पावसाचा जोर दिवसभर कायम होता. आंबेनळी घाटातील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांना मोठ्या कष्टाने गडावर पोहोचावे लागले. तरीही अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार व्हावे, या इच्छेने हजारो शिवभक्त गडाकडे रवाना झाले.
तुफान गर्दी – पायऱ्यांवर आणि रस्त्यांवर लोंढा
गडाच्या पायऱ्या, माची परिसर आणि सभोवताली संपूर्ण गर्दी उसळली होती. प्रतापगड पार्किंगपासून शिवदुर्ग धाबा, प्रतापगड माची हस्तकला केंद्रापर्यंत वाहनांचा जथा दिसून येत होता. चारचाकी व दुचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने परिसरात उत्साहाचे आणि गडबडीचे वातावरण पसरले होते.
पावसातही मशाली प्रज्वलित
गावकऱ्यांसह शिवभक्तांना प्रश्न पडला होता की पावसामुळे मशाली पेटतील का? पण जणू आई भवानीच्या आशीर्वादाने मशालींनी अधिकच तेजाने उजळून गडाला ऐतिहासिक दिव्यता दिली. पावसाच्या सरी, धुक्याचे आवरण आणि मशालींचा लालसर प्रकाश यामुळे प्रतापगड स्वर्गीय भासू लागला.
सोहळ्याची थरारकता
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, अग्नीकलेचे मोहक प्रयोग आणि जयघोषाच्या लहरींनी गडाचा प्रत्येक कण थरारून गेला. पावसात भिजत मशालींचा नजारा अनुभवताना प्रत्येक शिवभक्ताच्या अंगावर रोमांच उभा राहिला.
आयोजन व सोयी-सुविधा
मशाल महोत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी भोजन व महाप्रसादाची व्यवस्था चोख ठेवली. सातारा व महाबळेश्वर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला. पोलीस अधीक्षक तुषार जोशी पोलीस निरीक्षक सांडभोर साहेब पोलीस उपनिरीक्षक रूपाली काळे यांनी जातीने लक्ष देऊन व्यवस्था केली. महावितरणने विद्युत व्यवस्थेत कोणताही अडथळा येऊ दिला नाही. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्न आणि सुरळीत पार पडला. आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळेस मदत कार्यासाठी तत्पर होते.महाबळेश्वर परिषदेने या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.
✨ अविस्मरणीय सुवर्णक्षण
Comments
Post a Comment