महाबळेश्वर तालुक्यात महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त रस्ता अदालतांचे आयोजन
महाबळेश्वर तालुक्यात महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त रस्ता अदालतांचे आयोजन
जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात महसूल विभागामार्फत दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत महसूल सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांच्या मागण्या प्रत्यक्ष ऐकून त्यांच्या अडचणींवर जागेवरच तोडगा काढण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांच्या वादांवर तोडगा काढण्यासाठी रस्ता अदालतांचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तडजोडीच्या माध्यमातून समाधानकारक निर्णय घेतले जात आहेत.
मेटतळे गावात पाच वर्षांचा रस्त्यावरील वाद मिटला
गुरुवार दि. २५ रोजी मौजे मेटतळे येथील गट नं. ८/१ ते ११/१७ या रस्त्यासंदर्भात रस्ता अदालत पार पडली. या रस्त्याबाबत श्री. अनिल लेखराज खोसला व श्री. राजेंद्र गोविंद सुर्वे यांच्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून वाद सुरू होता. अखेर तहसिल प्रशासनाच्या पुढाकाराने दोन्ही बाजूंमध्ये तडजोड घडवून आणण्यात आली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार करण्यात आला.
सदर रस्त्याचे उद्घाटन महाबळेश्वरचे तहसिलदार श्री. सचिन मस्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून करण्यात आले. तहसिलदारांनी स्वतः उपस्थित राहून दोन्ही पक्षकारांना सामोपचाराने समेट घडवून आणला व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्ता खुला करून ताब्यात देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. तसेच मेटतळे गावच्या सरपंच सौ. शांताबाई विठ्ठल शिंगिरे, मंडळ अधिकारी आर. आर. शिंदे, ग्राम महसूल अधिकारी सौ. एम. बी. भोसले, पोलीस पाटील श्री. मंगेश शिंगिरे, ग्रामपंचायत शिपाई सूरज रेवने यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.
इतर गावांमध्येही रस्त्यांचे वाद निकाली
याआधी दि. २२ रोजी राजपुरी येथे, तर दि. २३ रोजी मांघर आणि आकल्पे येथे प्रत्येकी एक रस्ता तडजोडीने बांधावरच वाद मिटवून खुला करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून इतर गावांमधील रस्त्यांबाबतही चर्चेच्या माध्यमातून वाद मिटविण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा मिळत आहे.
ग्रामविकासासाठी पाऊल
महसूल सेवा पंधरवड्यातील रस्ता अदालत या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले वाद मिटण्यास हातभार लागला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत थेट रस्ता उपलब्ध झाल्याने शेतीकाम, वाहतूक आणि दळणवळणाची सोय सुधारण्यास मदत होणार आहे. गावोगावी चालू असलेले हे प्रयत्न ग्रामविकास आणि सामाजिक ऐक्यासाठी सकारात्मक ठरणार असल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment