दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; सेवा शक्ती संघर्ष संघटनेचा सरकारला इशारा
दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; सेवा शक्ती संघर्ष संघटनेचा सरकारला इशारा
मुंबई प्रतिनिधी (एम. एस. कारंडे) :
दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रातील नागरिकांना वाहतूक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कारण राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी सरकारविरोधात आंदोलनाची तयारी करत आहेत. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ या संघटनेने दिवाळीपूर्वी आंदोलन छेडण्याचा इशारा देत सर्वसामान्य प्रवाशांची चिंता वाढवली आहे.
या संघटनेचे अध्यक्ष भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सरचिटणीस सतीश मेटकरी तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत हे नेतृत्व करीत आहेत. संघटनेने सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत –
वेतनवाढ व थकबाकी तातडीने देण्यात यावी.
सेवा अटी आणि सुविधा सुधाराव्यात.
कायम झालेले चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा.
सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे.
सेवा शक्ती संघर्ष संघटनेने वारंवार निवेदनं दिल्यानंतरही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने दिवाळीपूर्वी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. या संघटनेने सांगितले की, “प्रवासी अडचणीत येऊ नयेत म्हणून आम्ही संयम बाळगला, पण शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने लढा उभारावा लागणार आहे.”
ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हीच मुख्य जीवनवाहिनी आहे. दिवाळीच्या काळात लाखो नागरिक गावी जाण्यासाठी प्रवास करतात. आंदोलन झाल्यास बसेस बंद पडून हजारो प्रवाशांचे हाल होतील, तर खाजगी वाहतूकदार संधी साधून भाडेवाढ करण्याची शक्यता आहे. व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी वर्ग यांना याचा थेट फटका बसणार आहे.
पूर्वीही अशाच आंदोलनांमुळे राज्यभर एसटी सेवा ठप्प झाली होती. यंदा दिवाळीच्या सणासुदीत पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारला मोठ्या नाराजीतून जावे लागेल. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे.
आता सरकार आणि सेवा शक्ती संघर्ष संघटना यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोडगा न निघाल्यास दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांचे दिवाळीचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती.
Comments
Post a Comment