श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे भव्य नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी

श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे भव्य नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी

पार प्रतिनिधी (राजेश सोंडकर)–

 श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी शारदीय नवरात्रौत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा, सोमवार, २२ सप्टेंबरपासून सुरू होणारा हा सोहळा आश्विन शुद्ध दशमी, गुरुवार, २ ऑक्टोबरपर्यंत पार पडणार आहे. देवस्थान विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांनी सर्व भाविकांना या दिव्य उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व

श्रीरामवरदायिनी मातेस चारही युगांमधील गौरवशाली स्थान आहे. कृतयुगात तिने महिषासुरमर्दिनीचे रूप धारण केले, त्रेतायुगात प्रभु श्रीरामांना वर दिल्याने ती श्रीरामवरदायिनी माता म्हणून प्रसिद्ध झाली. द्वापारयुगात धर्मराजाला कृपाप्रसाद दिला, तसेच रुक्मिणीची श्रीकृष्णप्राप्तीची मनोकामना पूर्ण केली. कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्रदान करून ती त्यांच्या सोबत राहिली. समर्थ रामदास स्वामींनीदेखील तुळजा भवानीला रामवरदायिनी म्हणून संबोधले आहे. या परंपरेचा गौरव जागवण्यासाठीच हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

उत्सवाची सुरुवात व कार्यक्रम

सोमवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्रीरामवरदायिनी मातेला जलाभिषेकाने उत्सवाची सुरुवात होईल. सकाळी १० वाजता सनई-चौघड्यांच्या निनादात व मंत्रोच्चारांत नंदा-दीप प्रज्वलित करून घटस्थापना केली जाईल. दररोज आरती, महाप्रसाद, संगीत भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनविशेष कार्यक्रम

प्रतिपदा (२२ सप्टेंबर): घटस्थापना, आरती, रात्री १० वाजता ह.भ.प. बी.ए. महाराज अंबिका भजनी मंडळ (वाई) यांचे भजन.

चतुर्थी (२६ सप्टेंबर): रात्री १० वाजता कुंकूमार्चन.

पंचमी (२७ सप्टेंबर): सकाळी ९ वाजता शंभू महादेव अभिषेक, रात्री १० वाजता ह.भ.प. विवेक महाराज कोंढरे यांचा भारुड कार्यक्रम.

अष्टमी (३० सप्टेंबर): सकाळी ८ ते ११ सर्व देवदेवतांचा अभिषेक, दुपारी १२ वाजता गोंधळ, दुपारी २ वाजता हळदी-कुंकू.

नवमी (१ ऑक्टोबर): सकाळी ११.३० वाजता घट हलविणे व होमाची पूर्णाहुती.

दशमी (२ ऑक्टोबर): सायंकाळी ५ वाजता सिमोल्लंघन, शमीपूजन, शमीपत्रे वाटप व सोने लुटण्याचा कार्यक्रम. त्यानंतर नवरात्रौत्सवाची सांगता.


हा नवरात्रोत्सव भाविकांसाठी एक अध्यात्मिक पर्वणी ठरणार असून, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आयोजकांचे आवाहन आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl