श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून कूंभरोशी येथे नवरात्र उत्सव उत्साहात
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून कूंभरोशी येथे नवरात्र उत्सव उत्साहात
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कूंभरोशी व कूंभरोशी विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. गावातील तरुणांनी व धारकऱ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवत परंपरेप्रमाणे दररोज दूर्गामातादौड काढत देवीची आराधना केली.
रविवारी दि. २८ सप्टेंबर रोजी किल्ले प्रतापगड येथे कूंभरोशीतील उत्साही धारकऱ्यांनी पारंपरिक घोषणांनी दुमदुमत दूर्गामातादौड काढली. या वेळी श्री शिवप्रताप वाद्य पथक, कूंभरोशी यांनी समधूर वादन करून वातावरण भारावून टाकले.
त्यानंतर सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन झाले. एकत्रिकरणानंतर गावातील तरुणांनी देशभक्तीपर गीते गात, “भारत माता की जय” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी दुमदुमत ग्रामप्रदक्षिणा करून पारंपरिक दूर्गामातादौड काढली.
मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी देखील कूंभरोशी येथे पारंपरिक दूर्गामातादौड, देवीची आरती आयोजित करण्यात आली. रात्री पुन्हा एकदा श्री शिवप्रताप वाद्य पथकाच्या माध्यमातून गगनभेदी वादनाने वातावरण उत्साहपूर्ण बनले.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सलग तीन दिवस कूंभरोशी गावात धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीचा संगम अनुभवायला मिळाला. ग्रामस्थ, तरुण व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून गावभरात उत्साह, श्रद्धा आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.
Comments
Post a Comment