२८ सप्टेंबर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून सर्व शासकीय कार्यालयात साजरा व्हावा – महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाची मागणी
२८ सप्टेंबर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून सर्व शासकीय कार्यालयात साजरा व्हावा – महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाची मागणी
विलास काळे
महाबळेश्वर प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाने महाराष्ट्र शासनाकडे ठोस मागणी केली आहे की, दरवर्षी प्रमाणेच यंदाही राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात हा दिवस उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा व्हावा.
माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी अधिकारी व त्यांच्या कामकाजावर थेट प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळतो. या कायद्यामुळे शासन व प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढीस लागते. जनतेमध्ये या कायद्याबद्दल अधिकाधिक जागृती झाल्यास लोकशाही मजबूत होण्यासोबतच शासन-जनता यांच्यातील विश्वास दृढ होईल, असे मत महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत (सनी) ननावरे यांनी व्यक्त केले.
श्री. ननावरे यांनी पुढे सांगितले की, शासनाने आधीच प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविणे, माहिती अधिकार कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, तसेच माध्यमांद्वारे या उपक्रमांना प्रसिद्धी देणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांचा सहभाग वाढेल आणि शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
यावर्षी २८ सप्टेंबर हा दिवस रविवारी आल्याने प्रत्यक्ष साजरा करण्यासाठी २९ सप्टेंबर या सोमवारी सर्व शासकीय कार्यालयांनी तो काटेकोरपणे पाळावा, अशी ठाम मागणी देखील ननावरे यांनी शासनाकडे केली आहे.
माहिती अधिकार दिन हा केवळ एक औपचारिक उत्सव नसून लोकशाहीतील उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेचे प्रतिक असल्याचेही त्यांनी नमूद केले. शासनाने या दिवसाचे महत्त्व ओळखून प्रत्येक विभागाला सक्रीय पद्धतीने जनजागृती मोहिमेत सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षा झोपडपट्टी सुरक्षा दलाने व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment