साताऱ्यात शाही दसरा सीमोल्लंघन सोहळ्याची जय्यत तयारी – उदयनराजेंच्या उपस्थितीत पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे शिवप्रेमींना आवाहन
सातारा प्रतिनिधी |
सातारा शहरात यंदाचा शाही दसरा सीमोल्लंघन सोहळा अत्यंत देखणेपणाने पार पडावा, यासाठी कनिष्क मंगल कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शासन प्रतिनिधी, स्थानिक मान्यवर, शिवप्रेमी संघटना आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाची रूपरेषा निश्चित केली.
या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघ संयोजक व शिवप्रेमी सुनील काटकर यांनी आवाहन केले की,
“सीमोल्लंघनाचा हा ऐतिहासिक सोहळा खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत, फेटे परिधान करून उपस्थित राहावे. पारंपरिक पोशाखामुळे शाही सोहळ्याला अधिक देखणेपणा लाभेल.”
बैठकीत उपस्थित मावळ्यांनी सोहळा आकर्षक करण्यासाठी विविध सूचना मांडल्या. शासन व संयोजन समितीने त्या सूचनांचे एकत्रिकरण करून कार्यक्रमाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. यंदाचा दसरा मेळावा आणि सीमोल्लंघन सोहळा पोवईनाका, सातारा व जलमंदिर परिसरात पार पडणार असून, या ठिकाणी उदयनराजे स्वतः उपस्थित राहून शिवप्रेमींसोबत जल्लोष करतील.
रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी सांगितले,
“आमचे दैवत खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा सीमोल्लंघन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून, उत्साहात आणि शिस्तीत हा सोहळा साजरा करूया.”
बैठकीला शिवछत्रपती उदयनराजे मित्र समूहाचे कार्यकर्ते, स्थानिक शिवप्रेमी तसेच सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 या पारंपरिक व ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने सातारा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, दसरा मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी शिवप्रेमी आतुरतेने तयारी करत आहेत.
Comments
Post a Comment