महाबळेश्वरमध्ये प्रथमच राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन
महाबळेश्वर प्रतिनिधी (विलास काळे):
कॅरम खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सातारा हौशी कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वरमध्ये प्रथमच राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मलबेरी कॉटेजेस, मेटगुटाड येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये ३ विश्वचषक विजेते खेळाडू प्रशांत मोरे, संदीप दिवे आणि योगेश परदेशी यांचा समावेश असेल. त्यांच्यासोबतच अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विजेते पुरुष आणि महिला खेळाडूही आपली कौशल्ये सादर करणार आहेत. यामुळे ही स्पर्धा अधिक रोमांचक आणि प्रेक्षणीय ठरेल अशी अपेक्षा आहे.
राज्यातील कॅरमपटूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या स्पर्धेमुळे खेळाडूंना अधिकृत मानांकन मिळेल, ज्यामुळे त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला एक नवी दिशा मिळेल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडू १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. हे अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मुंबई कार्यालयात, पारेख महल, साखरम केर मार्ग, शिवाजी पार्क, माहीम येथे जमा करता येतील. अधिक माहितीसाठी इच्छुक खेळाडू ९९८७०४५४२९ या मोबाइल क्रमांकावर किंवा carrom.mca1954@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करण्यासाठी, अरुण केदार (मानद सचिव) हे स्पर्धेचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत, तर अजित सावंत (खजिनदार) तांत्रिक संचालक म्हणून जबाबदारी सांभाळतील. राष्ट्रीय पंच सूर्कांत पाटील यांची मुख्य पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक स्पर्धेमुळे महाबळेश्वरमध्ये प्रथमच अशा मोठ्या स्तरावर कॅरमचा थरार अनुभवता येईल आणि महाराष्ट्रातील या खेळाला एक नवी ऊर्जा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment