पाचगणी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्र पूजन सोहळा व संचलन उत्साहात
पाचगणी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्र पूजन सोहळा व संचलन उत्साहात
पाचगणी प्रतिनिधी :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून या शताब्दी पर्वानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पाचगणी शहरात शस्त्र पूजन सोहळा आणि भव्य संचलन अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कार्यवाह विजय पवार यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. भावेश भाटिया व स्वप्नील परदेशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून अशितोष (संदीप) आठले यांनी मार्गदर्शन केले.
संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. सुधीर बोधे यांनी माहिती देताना सांगितले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे कार्य, स्वयंसेवकांची समाजासाठीची निःस्वार्थ सेवा व मदतीची परंपरा जनतेपर्यंत पोहोचावी हा प्रमुख उद्देश आहे. आज संघाचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नसून जगभरातील 46 हून अधिक देशांमध्ये सुरू आहे. मात्र या कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेला फार कमी आहे. त्यामुळे अशा संचलनाच्या माध्यमातून संघाची कार्यपद्धती व सामाजिक योगदान समाजासमोर आणले जाते.”
शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या संचलनात महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शाखांतील शेकडो स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. स्वयंसेवकांची पारंपरिक वेशभूषा, हातातील दंड, बॅनर, घोषणाबाजी आणि संघगीतामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
शस्त्र पूजनाच्या कार्यक्रमात शस्त्रांच्या पूजनामागील सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “शस्त्र ही केवळ युद्धासाठी नसून, धर्म, संस्कृती आणि समाज रक्षणाचे प्रतीक आहेत,” असे वक्त्यांनी स्पष्ट केले. तसेच शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही देण्यात आली.
या संचलनादरम्यान पाचगणी शहरातील नागरिकांनी स्वयंसेवकांचे ठिकठिकाणी स्वागत केले. अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाचे औचित्य आणि शिस्तबद्धतेची एकत्रित सांगड नागरिकांनी अनुभवली.
Comments
Post a Comment