शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ – विद्यार्थ्यांनी १८ सप्टेंबरपर्यंत करावा अर्ज
सातारा प्रतिनिधी :
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता विद्यार्थी १८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.
ही योजना १२ वी नंतर बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. यांसारख्या पदवी अभ्यासक्रम तसेच एम.ए., एम.एस.सी. यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
- मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत पुरवली जाते. त्यामध्ये –
- प्रतिमाह भोजन भत्ता रु. ४५००
- प्रतिमाह निर्वाह भत्ता रु. ६००
- मुलींसाठी प्रतिमाह स्वच्छता भत्ता रु. २००
- दरवर्षी नाईट ड्रेस, महाविद्यालयीन गणवेश, शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सहल, प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यादींसाठी भत्ता
अर्ज प्रक्रिया
- इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावा.
- ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सातारा यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : १८ सप्टेंबर
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक डॉ. कांचन जगताप यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की,
“या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी शासनाने ही योजना राबविली आहे.”
या मुदतवाढीमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली असून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी ही सुवर्णसंधी गमावू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment