अतिवृष्टीमुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर नुकसान; मदत कार्याला गती – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
अतिवृष्टीमुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर नुकसान; मदत कार्याला गती – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
मुंबई प्रतिनिधी :
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाने कहर केला असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती, सार्वजनिक मालमत्ता तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत या परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “शासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्तांना आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
पाटील म्हणाले की, मे महिन्यापासून राज्यभरात अनियमित पावसाचा फटका बसत आहे. खरीप हंगामात वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची नोंद आहे. शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून आतापर्यंत खरीप 2025 मध्ये नुकसानीसाठी 31.64 लाख शेतकऱ्यांना 225 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
याशिवाय आजच राज्यातील विविध विभागांसाठी मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये :
- अमरावती विभागासाठी 56.65 कोटी रुपये
- नागपूर विभागासाठी 23.85 कोटी रुपये
- पुणे विभागासाठी 14.28 कोटी रुपये
- छत्रपती संभाजीनगर विभागासाठी तब्बल 721.57 कोटी रुपये
- नाशिक विभागासाठी 13.77 कोटी रुपये
असा निधी थेट जिल्हा प्रशासनामार्फत वितरित केला जात आहे.
राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पंचनामे करून तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरांचे, रस्त्यांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेल्या ठिकाणीही पुनर्बांधणीसाठी स्वतंत्र योजना आखण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.
मंत्री पाटील म्हणाले की, “शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे. मदतकार्य गतीमान करण्यात आले असून पुढील काही दिवसांत आणखी निधी जिल्ह्यांना देण्यात येईल.”
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनस सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment