महाबळेश्वर मंदिरात सोमवारी भजनसेवा पुनश्च सुरू — तहसीलदार सचिन मस्के यांच्या प्रयत्नांना यश
महाबळेश्वर प्रतिनिधी (विलास काळे):
श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरात दर सोमवारी सुरू असणारी भजनसेवा काही काळ थांबली होती. परंतु माऊली भजनी मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि विद्यमान तहसीलदार मा. सचिन मस्के यांच्या प्रयत्नांमुळे हा भक्तिमय उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
माहितीनुसार, तत्कालीन तहसीलदार मा. अतुल म्हेत्रे साहेब यांच्या संकल्पनेतून या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला प्रारंभ झाला होता. अनेक वर्षे भाविक या सेवेतून आध्यात्मिक समाधान घेत होते. मात्र, काही कारणास्तव हा कार्यक्रम मध्यंतरी बंद पडला. भक्तांच्या तक्रारी आणि मागण्यांच्या पार्श्वभूमीवर माऊली भजनी मंडळाने या सेवेला पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.
श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सूचनेनुसार सप्टेंबर २०१५ पासून जुलै २०१९ पर्यंत ही भजनसेवा अखंड सुरू होती. आता विद्यमान तहसीलदार मा. सचिन मस्के यांनी पुढाकार घेत देवस्थान ट्रस्टमार्फत पुन्हा नियमानुसार हा कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता दिली. त्यानुसार प्रत्येक सोमवारी सायंकाळी मंदिरात भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून, त्यासाठी नाममात्र मानधनाची तरतूद देखील करण्यात आली आहे.
याबाबत तहसीलदार सो. यांनी सांगितले की, "श्री महाबळेश्वर मंदिर हा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाचा ठेवा आहे. येथे सुरू होणाऱ्या भजनसेवेने भाविकांना भक्तिमय अनुभव मिळेल आणि परिसरात धार्मिक वातावरण अधिक बळकट होईल."
माऊली भजनी मंडळाने तहसीलदार सचिन मस्के यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच या उपक्रमामुळे स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध होईल आणि भक्तांना अध्यात्मिक ऊर्जा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
या पुनश्च सुरू झालेल्या भजनसेवेच्या माध्यमातून श्री महाबळेश्वर मंदिरात दर सोमवारी भक्तिरसाचा अनुभव घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment