विद्यार्थ्यांसाठी रोटरी व इनरव्हील क्लबचा ‘करिअर गाईडन्स’ उपक्रम उत्साहात
विद्यार्थ्यांसाठी रोटरी व इनरव्हील क्लबचा ‘करिअर गाईडन्स’ उपक्रम उत्साहात
महाबळेश्वर प्रतिनिधी (राजेश सोंडकर)
महाबळेश्वर शहरातील रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर आणि इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर गाईडन्स’ या विशेष मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाबळेश्वर एज्युकेशन सोसायटी आणि गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमात सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात नाशिक येथील प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक वक्ते श्री. राजेश साळवे आणि डॉ. सुधा साळवे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकालीन शिक्षण, करिअरमधील विविध संधी आणि योग्य दिशा निवडण्याविषयी मार्गदर्शन केले. शैक्षणिक जीवनात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी ठोस उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. याशिवाय, मेतगुताड येथील चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या उपक्रमासाठी स्वामी ग्रुपचे मालक श्री. संतोष पारठे यांनी विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी मोफत बस आणि गाड्यांची व्यवस्था करून मोलाची मदत केली. महाबळेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्या सौ. शीला मिस आणि गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माने सर यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. विजय काळे आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. वर्षा पारठे यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शनाची संधी मिळते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनरव्हील क्लबच्या सदस्या सौ. सविता पल्लोड आणि रोटरी क्लबचे सदस्य श्री. दिनेश भिसे यांनी केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. विजय काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या वेळी इनरव्हील क्लबच्या सदस्या सौ. मुक्ता कोमटी, सौ. सपना अरोरा, पी.डी.सी. सौ. रोहिणी वैद्य, सौ. राधा मुक्कावार, सौ. शुभांगी काळे, सौ. सविता पल्लोड तसेच रोटरी क्लबचे सदस्य श्री. धीरेन नागपाल, श्री. दिलीप रिंगे, श्री. दिनेश भिसे, सौ. स्वाती भांगडिया आणि सौ. सरोज जंगम उपस्थित होते.
दोन्ही क्लबतर्फे उपस्थित विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची आणि शिक्षकांसाठी पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारा आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले.
Comments
Post a Comment